

कोपरगाव: कोपरगाव शहरवासियांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना प्रचंड मतांनी निवडून देत जो विश्वास टाकला आहे, त्याला कुठेही तडा जाऊ देऊ नका. पालिका सत्ताधाऱ्यांनी इंदौर, विशाखापट्टणम आदी शहराच्या धर्तीवर कोपरगावचा विकास करून नावलौकीकास्पद काम करावे, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, स्विकृत नगरसेवक अतुल काले, सोनल अमोल अजमेरे यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मकर संक्रांतीच्या पर्वावर संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
बिपीनराव कोल्हे पुढे म्हणाले, माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव शहर विकासात सातत्याने योगदान देत वाढत्या लोकसंख्येला पुरक अशी ध्येैय धोरणे राबवून त्यानुरूप काम केले. शहरवासियांनी ज्या विश्वासाने भाजपा, रिपाई, मित्रपक्ष, लोकसेवा आघाडीच्या हाती पालिकेची सत्ता दिली, त्यामुळे आपल्या सर्वांबरोबरच स्विकृत नगरसेवकांचीही जबाबदारी आता वाढली आहे. शहरवासियांना मुबलक पाणी, स्वच्छ, सर्वांग सुंदर कोपरगाव, दर्जेदार रस्ते, धुळमुक्त कोपरगाव आदी विकासाच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी कटीबध्द रहावे. इंदौर, विशाखापट्टणम आदि प्रगत शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या सोयी सुविधांचा पालिका सत्ताधाऱ्यांनी बारकाईने अभ्यास करून त्या आपल्याकडे राबविता येतील का, यावर काम करावे.
याशिवाय शासकीय, निमशासकीय योजनांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका निवडणुकीत भाजपा रिपाई मित्रपक्षाने जो विश्वासनामा जनतेपुढे सादर केला, त्याची सतत काळजी घेवुन काम करू.Kopargaon municipal development
उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर म्हणाले की, कोल्हे कुटूंबियांनी आपली उपनगराध्यक्षपदी निवड करून आंबेडकरी चळवळीचा मोठा गौरव केला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे यांनी ज्या विश्वासाने आम्हांस स्विकृत नगरसेवक म्हणुन निवडले, तो सार्थ करून शहरवासियांच्या विकासात जाणीवपुर्वक योगदान देवु, असे अतुल काले, सोनल अजमेरे म्हणाले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.