

अकोले: ब्राम्हणवाडा-कळस रस्त्यावर कुठलीही काळजी न घेता क्रुरतेने त्यांचे गळ्यास, शिंगास, शेपटास व पोटाला दोऱ्या बांधुन दाटीवाटीने 26 गोवंशाची वाहतूक करणारा कंटेनर बजरंग दलासह अकोले पोलिसांनी पकडला. यावेळी जनावरांची कत्तलीतून मुक्तता करण्यात आली आहे.
अकोले पोलिसांकडुन समजलेली माहिती अशी की, ब्राम्हणवाडा शिवारात पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पो.कॉ. सुहास गोरे हे ‘मिशन ऑलआऊट’ राबवत होते. त्यावेळी राहुल अनिल ढोक यांनी फोन करुन कळस गावाजवळ एक बंद कंटेनर गाडी येत असून, त्यात गोवंशाची वाहतूक होत असल्याचे कळवले. तसेच बंद कंटेनरमधील गोवंश पोहचविणेसाठी तसेच दिशा दाखवण्यासाठी एम एच 05 इ व्ही 3639 नंबर असलेली एक्स यु व्ही 300 हि गाडी कंटेनरच्या पुढे जात आहे, अशीही माहिती दिली. पो.हे.कॉ विजय खाडे यांनी तत्काळ कळस गाठले.
घटनास्थळी बजरंग दलाचे राहुल ढोक, नागेश चिंतामण कदम तसेच इतर कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी कंटेनर अडविण्यात आला. त्याची पाहणी केली असता, त्यात 26 जनावरे क्रुरतेने कोंबलेली दिसली.
दरम्यान, या कारवाईत के.ए 01, ए. एस 4557 या क्रमांकाचे दहा टायर कंटेनरमध्ये ताब्यात घेण्यात आले असून, चालक फरार झाला आहे. तर कंटेनरच्या पुढे चालणारी एक्स यु व्ही 300 गाडीही ताब्यात घेण्यात आली. त्यावरील चालकाने आपले नाव नरेश विलास मुर्तडक (वय-39 रा. राजुर ता. अकोले) सांगितले. त्यांना गुरे वाहतुकीचा परवाना व गुरांची खरेदी विक्रीचे बाबतची बिले आहेत काय, अशी विचारणा केली असता कोणताही पुरावा मुर्तडक देऊ शकले नाही.
या कारवाईत 36 लाख 32हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नरेश विलास मुर्तडक व अज्ञात आरोपींनी कत्तलीच्या इराद्याने विक्री करण्यासाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.