

नगर: शिर्डीत 4 एकर जमीन खरेदीप्रकरणी भोंदू अशोक खरात व त्यांची पत्नी कल्पना यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या खरेदीत साक्षीदार असलेले शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके, सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या चौकशीची मागणी फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांनी केल्याने त्यांच्यामागे ससेमीरा लागणार, असे बोलले जात आहे.
भोंदू खरातच्या शिर्डीतील गुंतवणुकीत अनेक ‘हात’ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राबल्याचे आता स्पष्ट होत आहे. अवघ्या पाच कोटीत चार एकर जमीन लाटण्यामागे शिर्डीत मोठी साखळी असल्याचे बोलले जात आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी गोंदकर यांची चार एकर जमीन गहाण ठेवत भोंदू खरातकडून व्याजाने पैसे घेण्याचा मार्ग साक्षीदारांनीच दाखविला. तीन कोटी व्याजाने घेत जमीन गहाण न देता थेट खरेदीखत केले गेले.
खरातसह आरोपी किरण सोनवणे, अरविंद बावके, अशोक तांबे दोन वाहनातून राहाता येथे पोहचले. तोपर्यंत जितेंद्र शेळके यांनी धावाधाव करत सगळा मेळ बसविल्याचा उल्लेख फिर्यादीतच आहे. दरम्यान, शिर्डीतील व्यवहारात चौघांची नावे साक्षीदार म्हणून समोर आली असली तरी भोंदूचे आणखी ‘खास’ कोण? याची चर्चा रंगली आहे. या खास विश्वासूच्या माध्यमातून भोंदू खरातने आणखी कोठे प्रॉपर्टीत गुंतवणूक केली का? याचाही तपास व्हावा, अशी चर्चा जोर धरू पाहत आहे.
गाडी बदलाचे कारण की पाठराखण?
जमीन खरेदीसाठी नाशिकहून दोन चारचाकी राहाता येथे आल्या. खरात, गोंदकर, बावके, सोनवणे एकाच वाहनात होते. दुसऱ्या वाहनात गुंजाळ, चौधरी व वाणी होते. पहिल्या वाहनातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला; मात्र दुसऱ्या वाहनातील साक्षीदारांचा फिर्यादीत केवळ उल्लेख आहे. गाडी बदलली म्हणून त्यांचा केवळ उल्लेख केला की कोणाच्या दबावामुळे त्यांना वाचवलं जातं, अशी चर्चा शिर्डी परिसरात आहे.
साक्षीदारांचा केवळ उल्लेख?
साक्षीदार म्हणून फिर्यादीत उल्लेख केलेली जितेंद्र शेळके, प्रभाकर गुंजाळ, सचिन वाणी आणि भाऊसाहेब चौधरी यांची नावे आरोपींमधून वगळण्यात आली आहेत. या चौघांच्याही चौकशीची मागणी फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांनी केली आहे. आता पोलिस तपासात त्यांची भूमिका काय? हे स्पष्ट होणार आहे.
जितेंद्र शेळकेंचे पाय खोलात!
श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांना एसआयटीने ा नोटिसा बजावल्या आहेत. शिर्डीतील जितेंद्र शेळके हे त्या ट्रस्टचे उपाध्यक्ष, तर सुभाष गमे ट्रस्टी होते. या दोघांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच जमीन खरेदीतही शेळके यांनी मोठी भूमिका बजावल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जाते.