

बोधेगाव: शेवगाव तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार साईनाथ कल्याण कवडे याला नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारला आहे. मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे न्यायालयाने आरोपीला कोणतीही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
‘सिंटेक सोल्युशन’ नावाखाली बनावट शेअर ट्रेडिंग कंपनी उभी करून दरमहा 12 टक्के परताव्याचे गाजर दाखवत आरोपीने शेवगावसह परिसरातील गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी अवधूत विनायक केदार यांच्यासह अनेकांनी एकूण 1 कोटी 61 लाख 42 हजार 900 रुपये आरोपीकडे गुंतवले. मात्र, ना नफा मिळाला ना मूळ रक्कम; उलट गुंतवणूकदारांची सरळसरळ आर्थिक लूट झाली. या प्रकरणी 28 ऑक्टोबर 2024 रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने जामिनासाठी धाव घेतली; मात्र फिर्यादींच्या वतीने ॲड. अनंत रामहरी देवकते यांनी न्यायालयात ठोस पुरावे मांडत जामिनाला विरोध केला.
न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांनी सुनावणीदरम्यान आरोपीने खोटी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांची पद्धतशीर फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट असल्याचे नमूद केले. तसेच उच्च न्यायालयात दिलेल्या हमीचाही भंग झाल्याचे नोंदीतून समोर आले. आरोपीने परतफेड केल्याचा दावा करणारी कागदपत्रे संशयास्पद असून फसवणुकीची रक्कम विविध मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून आरोपीने जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेर बँक खाती उघडल्याचेही समोर आले आहे. अशा परिस्थितीत आरोपीला जामिनावर सोडल्यास तो पळून जाण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्याची दाट शक्यता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यात केवळ पैशांची हमी ग्राह्य धरता येणार नाही, असा ठाम पवित्रा न्यायालयाने घेतला.
आरोग्याच्या कारणावरून मागितलेला जामीनही न्यायालयाने फेटाळून लावत कारागृहात आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध असल्याचे नमूद केले. परिणामी, गुन्ह्याचे गांभीर्य, फसवणुकीची प्रचंड रक्कम आणि आरोपीविरुद्ध उपलब्ध ठोस पुरावे लक्षात घेता साईनाथ कवडे याचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.