

चिचोंडी शिराळ/करंजी: दोन दिवसांपूर्वी मिरी येथे ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टरसह सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच आरटीओ विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत ग्रामस्थांनी मिरी बसस्थानक चौकात शुक्रवारी सकाळी सुुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनामुळे शेवगाव-पाथर्डी-पांढरीचापूल रस्त्यावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. ग्रामस्थांच्या भावना देखील या आंदोलनाच्या निमित्ताने तीव्र होत्या. कारखाना प्रशासन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कोणतेही नियंत्रण ठेवत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे म्हणत सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलनमागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका मिरी ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशासना पुढे देखील पेच प्रसंग निर्माण झाला आणि तालुका प्रशासनाने ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
नायब तहसीलदार किशोर सानप यांनी शासनाच्या विविध योजनांतून कुटुंबीयांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी संबंधित ट्रक चालक व मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगत आंदोलक व प्रशासन यांच्यात समन्वय साधून आंदोलन शांततेत स्थगित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
आंदोलनामुळे या मागण्या मान्य!
एकाही ट्रॅक्टरला दोन ट्रेलर चालवू दिले जाणार नाहीत. मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होईल, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या मार्गावर वाहन तपासणीसाठी कायमस्वरूपी पथक तैनात केले जाणार असल्याचे मोटार वाहन निरीक्षक गोरक्ष शेलार यांनी आश्वासन दिले.
मिरी भागात गतिरोधक बसविणार
मिरी परिसरात आवश्यक ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवले जातील. त्याचबरोबर ज्या ठिकाणी रस्ता अतिशय खराब झाला आहे, त्या ठिकाणची तत्काळ दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आसिफ सय्यद यांनी यावेळी दिले.
साखर कारखान्याकडून आर्थिक मदत
प्रसाद शुगर प्रायव्हेट लिमिटेड वांबोरी या साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात झाला. त्या अपघातात मृत झालेल्या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत देण्याचे कारखान्याचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी बबनराव पागिरे यांनी यावेळी आश्वासन दिले.