

संगमनेर: संगमनेर नगरपालिकेचे निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन, त्यांनी पदभार स्विकारला. रामकृष्ण सभागृहात विशेष सभा पार पडली. या पार्श्वभूमीवर पालिकेत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यामुळे आता काम चुकार अधिकारी- कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे, तर दुसरीकडे मात्र नागरिकांना आता विकास कामाची प्रतिक्षा लागली आहे.
तब्बल चार वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेत प्रशासकीय राज होते. यामुळे अधिकारी- कर्मचारी मनमानी कारभार करीत होते. त्या काळात नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. नगरसेवक अथवा राजकीय पक्षांचे पदाधिकारी पालिकेत फारसे फिरकत नव्हते. शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, वीज, कचरा, अतिक्रमण यासारखे महत्त्वाचे विषय कायम दुर्लक्षितचं राहिले. यामुळे शहराला अक्षरशः बकालपण आले आहे.
शहरात अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. प्रत्येक प्रभागासह वार्ड व उपनगरात समस्या जैसे-थेच आहेत. चार वर्षात पाच मुख्याधिकारी आले- गेले, मात्र राहुल वाघ यांनी तब्बल पावनेतीन वर्षे पालिकेत मनमानी कारभार केला. यानंतर रामदास कोकरे यांनी, एक वर्ष कामकाज पाहिले. पालिका निवडणुकीपुर्वी दोन मुख्याधिकाऱ्यांनी प्रभावी कामकाज पाहिले. यानंतर दयानंद गोरे यांनी पदभार स्वीकारला. पालिका निवडणुकीत त्यांनी, सहाय्यक निवडणूक अधिकारीपदी काम पाहिले. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन, पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यामुळे नगरसेवकांचा पालिकेत प्रवेश झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेत कामकाज अक्षरशः कासवगतीने सुरू होते, मात्र आता प्रत्येक वार्डातील नगरसेवकांना नागरिकांच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
नगरसेवकांवर विकास कामांचा दबाव
शहरातील कामे पूर्ण करण्यासाठी पालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सहकार्य गरजेचे असणार आहे. कामाची सवयच नसल्यामुळे त्यांच्यावर आता मोठा ताण येणार आहे. आरोग्य, बांधकाम, शिक्षण, वसुली विभाग, घरकुल, उद्यान यांसारख्या महत्त्वाचे विषय नागरिकांशी संबंधित आहेत. पालिकेत संगमनेर सेवा समितीची निर्विवाद सत्ता आहे. नगराध्यक्षांसह तब्बल 27 नगरसेवक निवडून आले आहेत, तर दोन अपक्ष व एक शिवसेनेचा नगरसेवक आहे. यामुळे आता विकास कामांचा दबाव नगरसेवकांवर असणार आहे, मात्र यासाठी पालिका कर्मचारी- अधिकाऱ्यांची साथ न मिळाल्यास नागरिकांना पुन्हा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
कामे कशी- कोण करणार..?
संगमनेर पालिकेत सध्या इतर तालुक्यांसह जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची सतत बदली होते. स्थानिक कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त झाल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. यामुळे बहुतांश कामे ठेकेदारी पद्धतीने दिली आहेत. यामुळे कामे कशी- कोण करणार? असा यक्ष प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.