

संगमनेर: गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर नगरपालिकेत प्रशासकीय राज असल्याने शहरात सर्वत्र अनाधिकृत प्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. आचार संहिता सुरू असतानाही अनाधिकृत फ्लेक्स मुख्य चौकात तसेच बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच लावले जात असल्याने प्रवाशांसह नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या चार वर्षांपासून नगरपालिकेत प्रशासकीय राज असल्याने मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यातच, वेळोवेळी राज्य शासनाने तसेच न्यायालयाने देखील अनाधिकृत फ्लेक्सचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शहरात अनाधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट झाला असून शहराचे विद्रूपीकरण होत आहे. शहरातील बसस्थानक परिसर, अकोले कॉर्नर घुलेवाडी रिक्षा स्टॉप, नवीन नगर रोड, शिवाजीनगर कॉर्नर, पेटीत विद्यालय, सह्याद्री कॉलेज, 132 केव्ही समोर बायपास रोड, अकोले नाका, दिल्ली नाका, जाणता राजा रोड, मालदाड रोड, यासह शहरात सर्वत्र महत्त्वाच्या ठिकाणी फ्लेक्स लावले जात आहे. फ्लेक्स लावणारे व नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे साटे लोटे असल्याने परवानगी न घेताच फ्लेक्स लावले जात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या एक वर्षापासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच राजकीय पदाधिकाऱ्याने फ्लेक्ससाठी जागा कायम स्वरूपी आरक्षित केल्याचेही बोलले गेले. सध्या आचारसंहितेमुळे हे फ्लेक्स काढण्यात आले तरी त्याचा ‘साठा’ मात्र तसाच ठेवण्यात आला असून त्यावरच अनाधिकृत फ्लेक्स लावले जात आहेत. दुकानांसमोर, धार्मिक स्थळासमोर, सिग्नलजवळ, प्रवेशद्वारावर असेच फ्लेक्स उभे आहेत.
सामाजिक संस्थांनी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला कळवून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मध्यंतरी आमदार सत्यजित तांबे यांनी या अनाधिकृत फ्लेक्स संदर्भात कडक भूमिका घेतल्याने शहरातील काही फ्लेक्स काढण्यात आले असले तरी दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने आजही फ्लेक्स तसेच आहेत. आचारसंहितेमुळे फ्लेक्स काढले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र याची सत्यता वेगळीच आहे.
सिग्नलवरील फ्लेक्समुळे अपघातांना निमंत्रण
अनेकदा सिग्नलवरच फ्लेक्स लावले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नगरपालिका निवडणुकीच्या काळातही फ्लेक्स कल्चर वाढल्याने याबाबत नागरिकात हा चर्चेचा विषय झाला. नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक तरी या अनाधिकृत फ्लेक्सला आळा घालणार का, असा प्रश्न आता संगमनेरकर उपस्थित करत आहे.
आचारसंहिते राजकीय फ्लेकस काढण्यात आले आहे. परवानगी घेऊन काही खाजगी फ्लेक्स लावले जातात. मात्र चौकात गर्दीच्या, ठिकाणी, मोक्याच्या वळणावर अशा ठिकाणी लावण्याची नगरपालिका परवानगी देत नाही. विनापरवाना फ्लेक्सवर, मालकांवर कारवाई करण्यात येईल.
दयानंद गोरे, मुख्याधिकारी सं.न.पा.