

पाथर्डी: तालुक्यातील जांभळी येथे दोन कुटुंबांमध्ये रविवारी सकाळी झालेल्या हाणामारीत दिलीप आश्रूबा आव्हाड (वय 35) या तरुणाचा खून झाला, तर सोमनाथ भगवान आव्हाड गंभीर जखमी झाला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादींवरून 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दिलीपचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे एका फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही बाजूंच्या आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे. त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका कुटुंबातील ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांनी पाथर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सकाळी 10.30 वा. गणपती मंदिराजवळील वेशीत वादातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी उफाळली. मध्यस्थी करून प्रकरण शांत झाले, मात्र काही वेळातच आरोपींच्या गटाने पुन्हा शस्त्रांसह हल्ला चढविला. नंतर नदीपुलाजवळ दिलीप आव्हाड व त्याचा भाऊ ज्ञानेश्वर यांना घेरून जीवघेणा हल्ला करण्यात आला. दिलीपला चाकू, कोयता व लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात नाव असलेले सर्व 12 आरोपी- तेजस सोमनाथ आव्हाड, सुलभा सोमनाथ आव्हाड, भगवान निवृत्ती आव्हाड, हिराबाई विठ्ठल आव्हाड, आश्राबाई भगवान आव्हाड, श्रीराम विठ्ठल आव्हाड, करन जनार्धन आव्हाड, सोमनाथ भगवान आव्हाड, विठ्ठल भगवान आव्हाड, वैभव विठ्ठल आव्हाड, जनार्धन भगवान आव्हाड, मंदाबाई जनार्धन आव्हाड (सर्व रा. जांभळी) या सर्वांवर खून, मारहाण, शस्त्रधारी हल्ला, दगडफेक आदी गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या घटनेत दुसरीकडे जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस सोमनाथ आव्हाड यांनीही पोलिसांत तक्रार देत आरोप केला, की फिर्यादी पक्षातील ज्ञानेश्वर व त्याचा भाऊ दिलीप आश्रूबा आव्हाड यांनीच चाकू व लोखंडी गजाने हल्ला करून आपल्या वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तेजस स्वतः गंभीर जखमी झाला असून तो सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
हिराबाई विठ्ठल आव्हाड (खुनाच्या प्रकरणातील आरोपी)
ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड (ठार मारण्याच्या प्रकरणातील आरोपी) यांना अटक करून पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ए. बी. विधाते, तर ॲड जे. टी. बटुळे, ॲड राजेंद्र ऊर्फ राणा खेडकर यांनी आरोपी पक्षातर्फे न्यायालयासमोर बाजू मांडली. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर तपास करीत आहेत.