

पाथर्डी: दोन गटातील हाणामारीत जखमी दिलीप अश्रुबा आव्हाड (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी ही घटना घडली.
ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद क्षणातच तुंबळ हाणामारीत परिवर्तित झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
तेजस सोमनाथ आव्हाड, विठठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांच्यासह पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जांभळीतील वातावरण तणावपूर्ण असून अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे.
दोन वर्षाच्या वादाने घेतला बळी
2023 साली दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने गाव सोडले होते. शनिवारी तो पुन्हा गावात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रविवारी दोन्ही गटातील पंधरा ते वीस जणांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. धारदार शस्त्रे, काठ्या, तसेच दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.