

अकोले: राजूर येथील डांगी जनावरांच्या प्रदर्शनामधून उत्कृष्ट जनावरांसह ‘चॅम्पियन’चीही निवड पशुसंवर्धन विभागाने केली खरी; मात्र आचारसंहितेचे कारण देऊन झालेल्या निवडी गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्या. त्यामुळे बक्षीस वितरणही झाले नाही. परिणामी, राजकीय जिरवाजिरवीत डांगी जनावरांचे बक्षीस वितरणही अडकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पुन्हा जनावरांच्या प्रदर्शनात डांगी जनावरे सहभागी करणार नसल्याचा निर्धार करत राग व्यक्त केला.
आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूरमध्ये डांगी देशी जनावरांचे व शेतमालाचे प्रदर्शन शनिवारपासून चार दिवस भरविण्यात आले. यामध्ये डांगी व देशी जनावरे शेतकरी बांधव विकण्यासाठी आणतात. यातून उत्कृष्ट डांगी वळू, बैलजोडीची निवड करून त्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. तसेच चॅम्पियन म्हणून निवडल्या जाणाऱ्या वळूला 31 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह दिले जाते. याशिवाय शेतीविषयक बी-बियाणे व पालेभाज्यांच्या विविध वाणांची निवड कृषी विभागातर्फे करून संबंधित शेतकऱ्यांनाही बक्षिसे दिली जातात.
या प्रदर्शनामध्ये डांगी गायींची किंमत सुमारे साठ हजारांपर्यंत गेली, तर काही बैलांची किंमत एक लाखापर्यंत पोहचल्याचे दिसले. ठाणे, नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद, जालना, गुजरात आदी भागातून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल झाली होती. काही जिल्ह्यांतून व्यापारी वर्गही जनावरे खरेदीसाठी आला होता. प्रदर्शनात सहभागी जनावरे, हॉटेल, दुकाने, पाळणे, तमाशाफड मालकांकडून कर घेतला जातो. यातून ग्रामपंचायतीला मोठे उत्पन्न मिळते.
ते’ आले आणि गडबड झाली..?
डांगी जनावरांच्या प्रदर्शनात बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी निमंत्रण पत्रिका व फ्लेक्सवर माजी आमदार वैभव पिचड आणि विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांची नावे झळकली. या वेळी मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, पुष्पा लहामटे, दिलीप भांगरे, सरपंच पुष्पा निंगळे, माजी सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच सतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे आदींसह आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर दिसले. पशुसंवर्धन विभागाने बक्षीसपात्र डांगी जनावरांची निवडही केली. आता निवडी जाहीर होऊन बक्षिसे व सन्मानचिन्ह मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु एका गटाने निवड केलेल्या जनावरांच्या मालकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्याची तयारी दर्शविली, तर दुसऱ्या गटाने आचारसंहितेचे भूत दाखवत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली. अकोले तालुक्यात कोणतीही निवडणूक नसतानाही, आचारसंहितेचे कारण पुढे करून बक्षीस वितरण लांबविल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
आचारसंहिता संपल्यावर होणार बक्षीस वितरण
प्रदर्शनात डांगी जनावरांच्या निवडीत आदत, दोन, चार, सहा, आठ दाती तसेच बैलजोडी, कालवड, गाभण गाय, दुभत्या गायीसह 65 प्रकारची जनावरे आणली होती. पशुसंवर्धन विभागाने जनावरांची निवड देखील केली; परंतु आचारसंहितेचे कारण देत चॅम्पियन तसेच अन्य बक्षीसपात्र जनावरांना आचारसंहिता संपल्यावर बक्षीस देण्यात येणार असल्याचे राजूरच्या सरपंच पुष्पाताई निगळे यांनी सांगितले.