

नगर तालुका /श्रीरामपूर: नगर तालुक्यातील खडकी आणि देऊळगाव सिध्दीत बिबट्याने दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दोघेही हल्ल्यातून बचावले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरागावात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यात आले असून तिसरा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
ज्वारी पिकाला पाणी देत असणाऱ्या महिलेसमोर अचानक बिबट्या आल्याने धावपळीत महिला जखमी झाली. नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे रविवारी (दि.7) दुपारी चार वाजता ही घटना घडली. देऊळगाव सिद्धी शिवारातील घोरपडदरा परिसरात सविता भाऊसाहेब चिर्के या ज्वारी पिकाला पाणी देत होत्या. अचानक समोर बिबट्या उभा ठाकल्याने जीवाच्या अंकाताने त्या पळाल्या. धावपळीत त्या जखमी झाल्या आहे. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर इजा झाली आहे. गावातील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
शेतीसाठी दिवसा वीज द्यावी तसेच पिंजरा बसवुन बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी उपसरपंच रमेश फुंडकर, घनश्याम गिरवले, विठ्ठल गिरवले, सचिन गिरवले, बाळासाहेब इंगळे, रेवननाथ इंगळे, सुभाष गिरवले, प्रफुल्ल वाडेकर, शुभम इंगळे, मकरंद गिरवले, आप्पासाहेब जाधव यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली अन् ती महिला वाचली. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने सतर्क होऊन तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा.
घनश्याम गिरवले, शेतकरी
अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याची दहशत संपता संपेना असे चित्र दिसून येत आहे. खडकी येथे बिबट्याने शेतकऱ्याच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. रविवारी ( दि.7) रोजी पहाटेच्या सुमारास हौसाराम वाडेकर हे शेतकरी घराजवळील रस्त्यावरून चालत असताना अचानक समोरून बिबट्या आला. बिबट्याने हौसाराम वाडेकर यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला परंतु वाडेकर यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला आहे. वाळकी रोडवरील गणेशवाडी परिसरात ही घटना घडली. तसेच रंगनाथ दत्तात्रय बहिरट, अशोक भिमाजी कोठुळे यांनीही बिबट्या पाहिला असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे सखाराम येणारे, योगेश चव्हाण यांनी खडकीत बिबट्याच असल्याच्या घटनेला दुजारा दिला आहे.
खडकीचे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी भयभीत झालेले आहेत. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
भाऊसाहेब बहिरट. सरपंच, खडकी
खडकी परिसरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी तसेच पिंजरा लावून बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच भाऊसाहेब बहिरट, अनिल पोपट कोठुळे, नंदू रोकडे, शेखर कोठुळे, संदीप गंगाधर कोठुळे, सुनील रामदास कोठुळे, योगेश बहिरट, सोमनाथ कोठुळे यांनी केली आहे.
नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्रोनद्वारे बिबट्यांची पाहणी करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत: आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. पशुधन बंदिस्त जागी बांधावे.
शैलेश बडदे, वनपरिमंडल अधिकारी, गुंडेगाव