

नगर: पडलो तरी आम्ही कसे पडलो, हे सांगण्यात आमदार रोहित पवार पटाईत आहे. ‘गिरे तो भी टांग उपर’ असा हा प्रकार आहे. निवडणुकीत पराजय झाला तरी स्वीकारला पाहिजे. त्याचे चिंतन केले पाहिजे, एवढे मला त्यांना सांगावे वाटते. आपल्याला करता आले नाही की त्याचे दोषारोप दुसऱ्यावर टाकायचे, याला राजकारणात, लोकशाही आणि जनाधारात कुठलेही स्थान नाही, अशी टीका विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.
अहिल्यानगर शहरातील एखा कार्यक्रमानंतर प्रा. शिंदे पत्रकारांशी बोलत होते. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार भाजपचा कार्यकर्ता होता. तसे त्याचे फोटो सेोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच आमदार सुरेश धस यांच्याबरोबरही फोटो व्हायरल झाले होते, असा आरोप करीत मतविभागणीचा फटका बसल्याचे सांगत आहेत. याबाबत शिंदे म्हणाले, की 2017 मध्ये आमदार सुरेश धस आणि मी भिन्न पक्षांत होतो. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात लढलो. त्याचा संदर्भात देत आमदार रोहित पवार काही तरी बोलतात. त्यामुळे मतांची विभागणी झाली असे त्यांचे म्हणणे साफ चुकीचे आहे.
महापालिकेच्या महायुतीसंदर्भात ते म्हणाले की, अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. सगळ्या पक्षांकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे महायुतीस विलंब होत आहे. महायुतीच्या संदर्भात सातत्याने अहिल्यानगरमध्ये चर्चा सुरू आहे. त्याला अंतिम स्वरूप आले नाही. आज संध्याकाळपर्यंत चर्चा पूर्ण होऊ जागावाटप होईल. सन्मानजनक तडजोड होईल.
थेट जनतेतून निवडलेला नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे पद कायम राहणार आहे. तसा नवीन कायदा केल्याबद्दल शिंदे म्हणाले, थेट जनतेतून नगराध्यक्ष होते. त्याला नगरसेवक म्हणूनही निवडणूक लढविता येते. जुन्या निमयामध्ये दोन प्रभागांतून निवडणूक लढविता येत होती; मात्र, निवडून आल्यावर एका पदाचा राजीनामा द्यावा लागत होता. आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक येत असल्याने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेला व्यक्तीचे प्रभागातील नगरसेवकपदाही कायम राहणार आहे. तशी कायद्यात दुरुस्ती केली आहे. तो कायदा जामखेडसाठी लागू राहणार आहे.
जुन्या नव्यांचा मेळ घालू
महापालिका निवडणुकीत निष्ठावंताना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत प्रा. शिंदे म्हणाले, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याला उमेदवारी दिली जाते. त्यात नवा-जुना असा कोणताही दुजाभाव होत नाही. मनामध्ये किंतु, परंतु, हेतू ठेवून कोणालाही डावलेले जाणार नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालत भारतीय जनता पक्ष निवडणुकीला सामोरा जाईल.