

राहुरी: शेकडो निष्पाप प्रवाशांचे बळी घेण्याचा अनोखे रेकॉर्ड अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाने प्रस्थापित केले आहे. हे श्रेय राजकीय नेत्यांसह जागतिक बँक व सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळविले आहे, अशा नाराजीचा सूर उमटत आहे. दैनंदिन अपघातांसह वाहतुकीचा खोळंबा, या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी, अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी केल्यानंतरही नेमकं कुणाचा आशिर्वाद घेवून, अवजड वाहन चालक सर्रास या महामार्गावरुन भरधाव वेगाने वाहने नेताना दिसत आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर अवजड वाहनांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा कायदा दाखवून, ‘काय-द्यायचं? बोला’ असे बोलण्यास भाग पाडणाऱ्या पोलिस प्रशासनामुळे या महामार्गावर अवजड वाहने सर्रास येत-जात आहेत, अशी संतप्त चर्चा आहे.
अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर सध्या अवजड वाहनांची अक्षरशः कोंडी निर्माण झाली आहे. प्रशासन केवळ कायद्याचा धाक दाखवित आहे, असा आरोप वाहन चालकांकडून होत आहे. महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी, कारवाईचे इशारे, दंडाची भाषा केली जाते, मात्र पर्यायी व्यवस्था कुठेच दिसत नाही. यामुळे वाहन चालकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. अहिल्यानगर-मनमाड महामार्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. दररोज शेकडो अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करतात, मात्र या रस्त्याची बिकट अवस्था, अपूर्ण कामे, ठिक- ठिकाणी खोदकाम, अर्धवट बॅरिकेड्स लावले जात आहेत. अशातच अचानक लागू होणाऱ्या निर्बंधांमुळे वाहन चालकांची मोठी अडचण होत आहे. चिरीमिरी घेऊन काही वाहनांसाठी मार्ग मोकळा केला जातो. इतरांविरुद्ध कारवाई केली जाते, अशा गंभीर तक्रारी काही वाहन चालकांनी व्यक्त केल्या आहेत.
..तर रस्ता का खोदला?
तब्बल 6 महिन्यांपासून राहुरी शहर हद्दीमध्ये अहिल्यानगर- मनमाड रस्त्याचे खोदकाम करून डांबरी रस्ता उखडवला आहे. परिणामी रस्त्यावरुन शहरात केवळ धूळ निर्माण होत आहे. वाहन चालकांसह राहुरीकरांना रस्त्यावरील धुळीचा नाहक सामना करावा लागत आहे. महामार्गाचे कामचं करायचे नव्हते तर, खोदकाम करून डांबरी रस्ता नष्ट का केला? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
तर आम्ही वर्गणी करून देतो? अवजड वाहने थांबवा
अहिल्यानगर- मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने प्रतिबंधाचा आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी बजावला, परंतू काही चिरीमिरी घेणाऱ्यांमुळे महामार्गावर अवजड वाहने सर्सास दिसत आहेत. चिरीमिरी घेणाऱ्यांना आम्ही वर्गणी करून रक्कम देऊ, परंतू त्यांनी अवजड वाहने बिनदिक्कत सोडून, अपघाताच्या घटना वाढवू नयेत, असे आवाहन अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय रस्ता कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी केले आहे.
प्रशासनातील समन्वयाचा अभाव
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव उघड दिसत आहे. अवजड वाहन चालकांना सरसकट दोषी ठरविण्याऐवजी ठोस नियोजन, स्पष्ट सूचना व व्यवहार्य पर्याय देण्याची गरज आहे, असे बहुतांश वाहन चालकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर बिनदिक्कत वाहतूक
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून अवजड वाहनांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले जात आहेत, परंतू प्रत्यक्षात पर्यायी मार्ग, योग्य पार्किंग व्यवस्था किंवा वेळापत्रक ठरवून दिले नाही. कायद्याचा धाक दाखवून ‘काय द्यायचं?’ असा थेट सवाल अवजड वाहन चालकांना केला जात आहे. ज्यांची तडजोड झाली, ती वाहने रस्त्यावर बिनदिक्कत वाहतूक करत आहेत.
तासन्- तास वाहने ठप्प
महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक एकेरी करावी लागत असताना, प्रशासनाने नियोजन न केल्यामुळे तासन्- तास वाहने जागेवरचं ठप्प होत आहेत. परिणामी मालक- चालकचे आर्थिक नुकसान होत आहे. मानसिक तणाव वाढत आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ही जबाबदारी मात्र एकमेकांकडे ढकलली जात आहे.