Nevasa Nagarpanchayat Politics: नेवासा नगरपंचायत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी?
नेवासा: नेवासा नगरपंचायत निवडणुकीची धुळवड आता शांत झाली आहे. उपनगराध्यक्षपदी कोणाची निवड होणार आहे अशा वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. नेवाशात नगराध्यक्ष शिवसेनेचा असला, तरी क्रांतिकारीचे जादा नगरसेवक निवडून आल्याने उपनगराध्यक्ष क्रांतिकारीचा की अन्य पक्षाचा होतोय याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीच्या शिवसेना (शिंदे गट), भाजप व गडाख गटाच्या क्रांतिकारी, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने लढती झाल्या. नगराध्यक्षपदासाठी 6, तर 17 नगरसेवकांसाठी 63 उमेदवार निवडून रिंगणात होते.
नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत सेनेचे डॉ. करणसिंह घुले व क्रांतिकारीचे नंदकुमार पाटील यांच्यात चुरशीची लढत होऊन डॉ. घुले नगराध्यक्ष झाले आहेत. 17 नगरसेवकांमध्ये 9 क्रांतिकारी, सेना-भाजप 6, आम आदमी 1 व अपक्ष 1 असे बलाबल झालेले आहे. महायुतीचा नगराध्यक्ष व बहुमत क्रांतिकारी पक्षाकडे आहे.
आता उपनगराध्यक्ष कोण होणार आहे. याविषयी वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. क्रांतिकारीचे बहुमत असल्याने या पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल असेच सर्वांना वाटत असताना कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतेय, अशी चर्चा असतांनाच आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी संजय सुखदान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर माघारीच्या वेळी त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाला पाठिंबा दिला व उमेदवारी माघार घेतली होती.
तसेच संजय सुखदान यांच्या पत्नी शालिनी सुखदान या प्रभाग 2मधून आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर शालिनी सुखदान विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यादेखील उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे जाणकार सांगतात. क्रांतिकारीचे जितेंद्र कुऱ्हे गटनेता झाले आहेत. उपनगराध्यक्षाच्या निवडीनंतरच खऱ्या अर्थाने नेवाशातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

