

नगर: महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीच्या फेऱ्या सुरू आहेत. काल रात्री लोणी येथे महायुतीच्या कोअर कमिटीची बैठक पालकमंत्री विखे पाटील यांच्यासमवेत झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली; पण तोडगा निघाला नाही. आज दुपारी पुन्हा आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात पाच ते सहा जागांवर घोडे अडले. अखेर रात्री पुन्हा बैठक बोलावण्यात आली होती.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. तरीही महायुती आणि आघाडीचे जागावाटप निश्चित नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे. इच्छुकांचे युती-आघाडीकडे डोळे लागले आहेत. महायुतीसाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष चर्चेमध्ये सहभाग घेत आहेत. स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये तोडगा निघत नसल्याने शिवसेनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आले आहे. त्यांनी 29 उमेदवारांची यादीच त्यांना दिली आहे. त्यावर दोन दिवसांत निर्णय देऊ असा निरोप देण्यात आला होता.
दरम्यान, काल रात्री शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ लोणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी गेले होते. तिथे तिन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जाते. मात्र, महायुतीचा अंतिम निर्णय झाला नाही.
रविवारी दुपारी पुन्हा आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, गणेश कवडे, संजय शेंडगे यांनी चर्चा केली. त्यात चर्चेत शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर दावा केला. मात्र, तिथे पाच ते सहा जागांवर एकमत झाले नाही. त्यामुळे पुन्हा रात्री बैठक बोलावण्यात आली होती. त्यात बैठकीत अंतिम चर्चा होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
उद्यापर्यंत महायुती, आम्ही आशावादी
महापालिकेसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत आज रात्रीपर्यंत निर्णय होईल. शेवटी किती जागा मागायच्या हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, महायुती व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी चर्चेअंती निर्णय होईल. चांगलं व्हावं, चांगलं घडावं अशी अपेक्षा आहे. सगळे उमेदवार कागदपत्रे घेऊन तयार आहेत. मात्र, तरीही उद्यापर्यंत महायुती जाहीर व्हावी, त्यासाठी आम्ही आशावादी आहोत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दुपारी सांगितले.
महायुतीसाठी सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना तिन्ही पक्षांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. अगदीच काही बोटावर मोजण्याइतक्या जागांवर चर्चा सुरू आहे. काही चर्चा अंतिम टप्प्यावर आहेत. 29 तारखेला निर्णय होईल आणि 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील.
संग्राम जगताप, आमदार