Nagawade Sugar Factory Resignation: नागवडे कारखान्याच्या उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांचा राजीनामा
श्रीगोंदा: नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी शनिवारी (दि. 27) कारखान्याच्या उपाध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा दिला. कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांची भेट घेऊन भोस यांनी त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. दरम्यान, भोस यांच्या राजीनाम्यामागे श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे.
नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी 2022मध्ये झाली होती. या निवडणुकीत राजेंद्र नागवडेंच्या नेतृत्वाखालील मंडळाने सर्व 21 जागा जिंकून वर्चस्व राखले होते. पदाधिकारी निवडीत अध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची, तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब भोस यांची वर्णी लागली होती. भोस यांनी जवळपास चार वर्षे उपाध्यक्षपद सांभाळले. मध्यंतरी नगर परिषद निवडणुकीत झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर भोस यांना राजीनामा द्यावा लागेल अशी अटकळ बांधली जात होती. ती आज खरी ठरली.
भोस यांचा राजीनामा घेण्यासाठी संचालकांनी अध्यक्ष नागवडे यांच्याकडे मागणी केली होती. शनिवारी सकाळी कारखाना अतिथीगृहात संचालक मंडळाची नागवडे, भोस यांच्या उपस्थितीत अनौपचारिक बैठक झाली. बैठकीला राकेश पाचपुते यांचा अपवाद वगळता सर्व संचालक उपस्थित होते. या बैठकीत संचालकांनी आपली भूमिका मांडली. एक वर्षासाठी अन्य संचालकाला उपाध्यक्षपदाची संधी देण्याची विनंती संचालकांनी केली. भोस यांनी राजीनामा देण्याबाबत सुरुवातीला नकार दर्शवला. मात्र, संचालक मंडळ सदस्यांच्या आग्रही मागणीनंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
या बैठकीनंतर भोस यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्याकडे उपाध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. भोस यांनी संचालकपदाचाही राजीनामा दिला आहे. दरम्यान, भोस यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाची 3 जानेवारीला बैठक बोलविण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान नव्या उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती समजली. राजीनाम्यानंतर भोस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
भोस यांचा राजीनामा प्राप्त: बांदल
भोस यांनी शनिवारी कारखान्याच्या उपाध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. संचालक मंडळाच्या 3 जानेवारी 2026 च्या बैठकीत यावर निर्णय होईल, असे कारखान्याचे प्रभारी कार्यालय अधीक्षक बी. जी. बांदल यांनी सांगितले.
तात्याची साक्ष अन् राजीनामा
संचालक मंडळ सदस्य भोस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर भोस यांनी स्वत:चे पद वाचविण्याचा प्रयत्न केला. निवडीपूर्वी राजेंद्र नागवडेंनी पूर्ण पाच वर्षे उपाध्यक्ष ठेवण्याचा शब्द दिला होता. त्या बैठकीला उपस्थित असलेल्या मध्यस्थ ‘तात्या’ची साक्ष काढण्याचा प्रयत्न भोस यांनी केला. पण अखेर संचालकांच्या आग्रहापुढे नमते घेत त्यांनी नाराजीनेच राजीनामा दिला.

