

कर्जत: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राजीव गांधीनगर येथील वसाहतीचा सिटी सर्व्हे मोजणीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. यामुळे येथील रहिवाशांना लवकरच आपल्या घराचा अधिकृत उतारा मिळणार आहे. राजीव गांधीनगर ही वसाहत शासकीय गायरान जागेवर वसलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार ही मोजणी प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेमुळे आता येथील नागरिकांच्या नावावर अधिकृत मालमत्ता पत्रक तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कामासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. स्थानिक पातळीवर नगराध्यक्षा रोहिणी घुले पाटील, तसेच बांधकाम समिती सभापती भास्करराव भैलुमे यांनी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला. त्यांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे आज प्रत्यक्ष मोजणी पूर्ण होऊन नागरिकांचे स्वप्न साकार होत आहे. मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी यासाठी मोलाची भूमिका बजावली.
जागेचा सिटी सर्व्हे उतारा प्राप्त झाल्यानंतर येथील रहिवाशांना अनेक फायदे मिळणार आहेत. यात प्रामुख्याने स्वतःच्या हक्काच्या घराचा अधिकृत मालकी हक्क मिळेल. घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. बँक कर्ज आणि इतर शासकीय योजनांसाठी हा उतारा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजीव गांधी नगरमधील समस्त नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून आम्ही या जागेच्या अधिकृततेची वाट पाहत होतो. आज खऱ्या अर्थाने आमचे प्रभागातील नागरिकांना न्याय मिळाला आहे, अशी भावना पाणीपुरवठा सभापती सतीश पाटील यांनी व्यक्त केली.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, नगराध्यक्षा रोहिणी घुले आणि बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे, पाणीपुरवठा सभापती सतीश पाटील आणि मुख्याधिकारी अक्षय भैलुमे यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.