

जामखेड: आपला देश कृषिप्रधान असून, कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान-गणित अध्यापक संघ व रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण 242 वैज्ञानिक मॉडेल्स सहभागी झाले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या हुबेहूब प्रतिकृतीने मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात, गटविकास अधिकारी शुभम जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे, भिवशेन पवार, पार्वती गाडेकर, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
मुळीक म्हणाले की, भविष्यात बाहेरून आलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होत असून, अशा उपक्रमांसाठी निधी वाढविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी विशेषतः शेती व कृषी तंत्रज्ञानाशी निगडित संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी विज्ञान म्हणजे कुतूहल व प्रश्न विचारण्याची प्रक्रिया असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी बाल वैज्ञानिकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी पेटंट मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रदर्शनासाठी व्ही. एम. वाळुंजकर, दीपक धनगर, प्रफुल्लचंद्र पवार, सोपानराव कदम, अनिल गवळी, बाळासाहेब सोनवणे, संदीप जगताप, विक्रम कुलकर्णी व रविंद्र हिंगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रास्ताविक प्राचार्य बी. के. मडके यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी इंगळे व शंभूलाल बडे यांनी केले. मुख्याध्यापिका आर. आर. भोर यांनी आभार मानले. एनसीसी विभागाने शिस्तबद्ध नियोजन उत्तमरीत्या पार पाडले.