

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथील अतिक्रमणे विविध कारणास्तव चर्चेत आहेत. नाशिक विभागीय आयुक्तांनी सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याचा आदेश दहा वर्षांपूर्वी दिला होता. तसेच 21 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार मागील महिन्यात सीना नदीपात्रातील अतिक्रमणांत असलेली मुख्य बाजारपेठ हटविण्यात आली. प्रशासनाने आता आपला मोर्चा सीना नदीपात्र ते ग्रामदैवत बायजामाता डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांकडे वळविला आहे.
जेऊरचे आराध्य दैवत बायजामाता डोंगर परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. गावामधून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना तसेच नागरिकांना अतिक्रमणामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थीही या रस्त्याने प्रवास करतात. याच परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचा ही आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील येथील गोवंश हत्या अद्याप बंद झाली नाही. त्यामुळे अवैध कत्तलखानेही भुईसपाट करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. परंतु नोटिसा देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटविली नाहीत. सोमवारी (दि.12) पोलिस बंदोबस्तात सीना नदीपात्र ते बायजामाता डोंगर परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. याच परिसरात यापूर्वी तीन ते चार वेळेस दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यात्रोत्सवातील दगडफेकीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच मागील महिन्यात आठवडे बाजारच्या दिवशीच ग्रामस्थांवरही दगडफेकीचा प्रकार घडला होता. परिसरातील अतिक्रमणामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून, वाद वाढत असल्याची ही चर्चा नागरिक करीत आहेत.
अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, पावसाळ्यात पाणी तुंबणे, अपघातांचा धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, आपत्कालीन सेवांना अडथळा, देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांना होणारा त्रास याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले होते. परंतु महसूल, ग्रामपंचायत व इतर संबंधित विभागांच्या संयुक्त कारवाईमुळे परिस्थिती बदलत आहे. बायजामाता मंदिराच्या पायथ्याशी यात्रोत्सव तसेच नवरात्र उत्सव काळात वाहनांसाठी पार्किंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे तेथील अतिक्रमण ही हटविण्याची मागणी होत आहे.
जेऊरमध्ये तिसगाव पॅटर्न राबवा !
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे नुकतेच सर्व अनाधिकृत कत्तलखाने प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सील करण्यात आले आहेत. जेऊरमध्येही गोवंश हत्या होत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे ग्रामदैवत बायजामाता मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेले अवैध कत्तलखाने भुईसपाट करण्याची मागणी होत आहे.
विविध अतिक्रमणे प्रशासनाच्या रडारवर!
जेऊर गावात जाणारा मुख्य रस्ता, महावितरण कंपनी चौक ते सीना नदीपात्र रस्ता, गावांतर्गत रस्ते, वाघवाडी गावठाण, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, साळवे वस्ती रस्ता, सकस आहार विहीर परिसर, बायजामाता डोंगर परिसर, जुनी नगर वाट याचबरोबर विविध शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रशासनाच्या रडारवर असून त्यांच्यावरही लवकर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.