

कर्जत: ग्रामीण विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेची, समाजकारणाची व राजकारणाची प्रत्यक्ष ओळख मिळावी, या उद्देशाने येथील श्री अमरनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकतीच विधिमंडळाला भेट दिली.
या शैक्षणिक सहलीसाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांची कार्यपद्धती, कामकाजाची रचना, कायदे निर्मितीची प्रक्रिया, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
विधिमंडळातील प्रमुख अधिकारी नंदू वाघ, रोशन भेंगडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सभागृहातील कामकाज समजावून सांगितले. या उपक्रमासाठी सभापती प्रा. शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत मिटकरी आणि निखिल अभय पाटील यांचेही सहकार्य लाभले.