

नगर: अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार नरेंद्र कुलकर्णी यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून धमकावणे, दहशत निर्माण करणे व प्रचारात अडथळे आणण्याचे प्रकार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 9) जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट निवेदन देत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र कुलकर्णी यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, नरेंद्र कुलकर्णी, संजय शेंडगे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, दीपक खैरे, श्याम नळकांडे, मयूर मैड, दत्ता जाधव, संदीप दातरंगे, सचिन शिंदे, सतीश मैड, प्रशांत गायकवाड, श्याम शिंदे, संतोष गेणप्पा आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नरेंद्र कुलकर्णी प्रभाग 11 ‘ड’ मधून धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारी केली आहे. त्याच्या विरोधात प्रतिस्पर्धी भाजपचे सुभाष लोंढे उमेदवारी करीत आहेत. ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्यांच्या समर्थकांकडून प्रचारादरम्यान जाणूनबुजून अडथळे निर्माण केले जात असून, घराबाहेर मोठ्या संख्येने जमाव करून दहशत निर्माण केली जात आहे. 8 जानेवारी रोजी रात्री तख्ती दरवाजा परिसरात एका मतदाराच्या घरी जावून प्रचार करित असताना भाजपचे उमेदवार सुभाष लोंढे व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने जमून शिवीगाळ केली.
धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तू माझ्याविरुद्ध निवडणूक का लढवतोस, तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान, घटना घडली त्यावेळी पोलिस उपस्थित असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. प्रभागात दशहतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबियास धोका निर्माण झाला आहे. 20 जानेवारी 2026 पर्यंत पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तत्काळ चौकशी करू
8 जानेवारी रोजी झालेल्या प्रकारचा तत्काळ चौकशी करून निवडणूक दहशतमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच नरेंद्र कुलकर्णी यांना पोलिस संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेचे शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले.