

राहुरी : राहुरी नगरपरिषदेचा निकाल जाहीर होताच विधानसभा पोटनिवडणुकीची प्रशासनाने तयारी हाती घेतली. स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीचा पुढचा आमदार कोण? हे ठरविण्यासाठी पोटनिवडणूक महत्वाची असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसोबतच अक्षय कर्डिले, डॉ. सुजय विखे यांच्याभोवती फिरताना दिसत आहे.
राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये 2024 मध्ये स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी भाजपकडून निवडणूक लढविताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. पुढे, दुर्देैवाने स्व. कर्डिले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपकडून राहुरी नगरपरिषदेसाठी अक्षयकर्डिले यांनी नेतृत्व हाती घेतले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनामध्ये अक्षय कर्डिले यांनी राहुरी नगरपरिषदेमध्ये पहिल्यांदाच तगडा पॅनल उभा केला. परंतु माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवार गटात असलेले आपले ‘काका’ अरुण तनपुरे यांच्या साथीने जुन्या नव्या कार्यकर्त्यांची सांगड घातली. विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनाही सोबत घेत बेरजेचे राजकारण केले. यासह विधानसभा निवडणुकीतील अन्य चुका दुरुस्त करताना पालिकेची सत्ता आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले. 18-7 च्या फरकाने तनपुरे गटाने विजय मिळवला. त्यामुळे तनपुरे गट आता विधानसभा पोटनिवडणुकीची वाट पाहत आहे. मात्र, 2024 च्या विधानसभेला नगरपालिका ताब्यात असतानाही तनपुरेंना शहरातून अपेक्षित मते मिळालेली नाही. त्यामुळे आता सत्ता येऊनही पोटनिवडणूक फारच सोपी जाईल, असेही काही नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची तयारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत मतदार यादी निश्चिती होऊन कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीचा चौफेर उधळलेला वारू शमत नाही, तोच आता विधानसभा पोटनिवडणुकीच्या गप्पा पारावर रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव अंतिम आहे. तर भाजपकडून अक्षय कर्डिलेंसोबतच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठीही कार्यकर्ते आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे.
राजकीय हवा निकालातूनही दिसणार?
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावीच, असा जोर तनपुरे समर्थकांनी धरला आहे. तनपुरे कारखाना पाठोपाठ राहुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल तनपुरेंसाठी एकतर्फी लागल्याने समर्थकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र तनपुरेंची आज वरवर दिसणारी राजकीय हवा प्रत्यक्ष मतदान यंत्रातून निकालात दिसणार का, हाही प्रश्न आहेच.
चर्चा तर होणारचं !
डॉ. सुजय विखे यांचा सर्वच मतदार संघात दबदबा आहे. दक्षिणेत खासदार म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. राहुरी विधानसभा दक्षिणेत आहे. त्यामुळे राहुरीचे राजकारण डॉ. विखेंना पुरते माहिती आहे. प्राजक्त तनपुरे हे राजकारणात तरबेज आहेत. या तुलनेत अक्षय कर्डिले हे नवखे आहेत. त्यामुळे तनपुरेंना रोखण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनीच उमेदवारी करावी, अशीही चर्चा आहे. अक्षय कर्डिले यांना जिल्हा परिषदेत संधी देण्याबाबतही बोलले जाते. मात्र, डॉ. सुजय विखे हे निवडणुकीत उतरणार असल्याचे कोणतेही अधिकृत विधान नसल्याने ही फक्त चर्चाच दिसते आहे.
देवळालीच्या दादांचीही चर्चा
राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये सुजय दादा, प्राजक्त दादा व अक्षय दादा यांची चर्चा होत असताना देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे आताच नगराध्यक्षपदी विराजमान झालेले सत्यजित कदम या चौथ्या दादांच्या नावावर प्रकाशझोत पडला आहे. पोटनिवडणुकीत भाजपाकडून सत्यजित कदम यांचेही नाव चर्चेत आहे.
..तर तनपुरे कोणत्या चिन्हावर लढणार?
प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा पक्ष नेमका कोणता असेल? यावर वेगवेगळे तर्क मांडले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले प्राजक्त तनपुरे यांच्याकडून तनपुरे कारखान्यात स्थानिक आघाडी करण्यात आली होती. त्या पाठोपाठ राहुरी नगरपरिषदेलाही तनपुरेंनी विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे पोटनिवडणुकीत तनपुरे हे तुतारी फुंकणार की सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी पुन्हा स्थानिक आघाडीवर लढणार, याची कार्यकर्त्यांनाही उत्कंठा असणार आहे.
अक्षय कर्डिलेंना मोठी सहानुभूती
भाजपच्या निष्ठावंतांकडून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले हे सक्षम पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. स्व. शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी अक्षय कर्डिलेंना आमदार करा, असे आवाहन निष्ठावंत भाजप समर्थक करत आहेत. त्यांना जनतेतून प्रचंड सहानुभूती आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचीही ताकद असल्याने कार्यकर्ते निवडणुकीची वाट पाहत आहे.