

संगमनेर: संगमनेर शहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, बंद अवस्थेतील पथदिवे, ढिसाळ कचरा व्यवस्थापन याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, याकडे प्रशासनाने गांभीर्याने न पाहिल्यास शिवसेना-महायुती स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
संगमनेर नगरपालिकेतील प्रशासक राज संपुष्टात आले. आता नवीन नगराध्यक्ष व नगरसेवकही निवडून आले. संगमनेर शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, असे असतानाही शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार अनेक प्रभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. काही भागांतील पथदिवे बंद अवस्थेत असून, कचराही उचलला जात नसल्याने शहरातील सर्वच उपनगरामध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचे कचरा व्यवस्थापन पूर्णतः कोलमडले आहे. या गंभीर बाबीकडे नगरपरिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी, निवेदने देऊन या महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने संपूर्ण शहरात तीव्र स्वरूपाची नाराजी पसरल्याचे महायुतीचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, सर्व प्रभागांमध्ये तत्काळ पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, बंद असलेले पथदिवे युद्धपातळीवर दुरुस्त करावेत तसेच शहरातील केरकचरा त्वरित उचलून शहर स्वच्छ ठेवावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, विद्यमान शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अभिजीत पुंड, प्रकाश राठी, सुदाम ओझा राहुल भोईर, मुकेश मुर्तडक, प्रवीण दिड्डी, शशांक नामन, सागर भोईर, वरद बागुल, अक्षय वर्पे, उमेश ढोले, लाला दायमा, भारत गवळी, सपना जाधव, संगीता पुंड, पूनम अनाप, पूनम दायमा, विकास पुंड, दिलीप रावळ आदी पदाधिकाऱ्यांनी दिला.
महायुतीच्या मागण्या गांभीर्याने न घेतल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर शिवसेना ही महायुती स्टाईलने तीव्र आंदोलन तसेच लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन छेडेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील.
दिनेश फटांगरे, शिवसेना शहरप्रमुख