

बोधेगाव: शेवगावात शेतकऱ्यांच्या घामाचे सोने लुटण्याचा शासकीय यंत्रणांच्या आशीर्वादाने चाललेला कापूस घोटाळा उघडकीस आला असून, केंद्र शासनाच्या भारतीय कापूस महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेली खरेदी केंद्रे आज थेट व्यापाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही केंद्रे प्रत्यक्षात दलाल-व्यापारी साखळीला पोसणारी यंत्रणा ठरत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दि. 11 नोव्हेंबरपासून शेवगाव बाजार समितीच्या अखत्यारीत रिद्धी सिद्धी, कोटेक्स, दुर्गा फायबर, अन्नपूर्णा कोटेक्स, श्री मारुतराव घुले पाटील व बालमटाकळी येथील साई कोटेक्स येथे शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू आहेत. मात्र, सरकारने यंदा लागू केलेली ऑनलाइन नोंदणी पद्धत ही शेतकऱ्यांसाठी नसून व्यापाऱ्यांसाठीच असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.
ऑनलाइन नोंदणी, केंद्र निवड, तारीख व वेळ याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणतेही सूचना फलक नाहीत, कोणतेही मार्गदर्शन नाही. शेतकरी विचारणा करतात तेव्हा उडवाउडवीची, उद्धट उत्तरे दिली जात आहेत. दुसरीकडे, खासगी व्यापाऱ्यांना मात्र क्षणात ऑनलाइन माहिती मिळते आणि ते लगेच खरेदी केंद्र ‘बुक’ करतात, हा प्रकार सरळसरळ संगनमताचा संशय निर्माण करतो. दररोज शासकीय खरेदी केंद्रांवर ठराविक वाहनांतून मोठ्या प्रमाणात कापूस उतरतो आणि ही सर्व वाहने व्यापाऱ्यांचीच असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही संबंधित अधिकारी डोळेझाक करत आहेत. म्हणजेच शासकीय केंद्रांवर शेतकरी नाहीत, तर दलालांचे वाहने रांगेत उभे आहेत! हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा उघड डाव आहे.
शासकीय कापूस खरेदी केंद्रे शेतकऱ्यांसाठी सुरू आहेत की व्यापाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे चालवली जात आहेत? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. जर तातडीने ऑनलाइन प्रणाली पारदर्शक केली नाही, सूचना फलक लावले नाहीत, व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवला नाही आणि दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर शेवगाव तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शेतकरी वर्गाकडून देण्यात येत आहे.
शेतकरी बाजूला: व्यापाऱ्यांचीच चलती!
पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर सोमवारी (दि. 22) बालमटाकळी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, हे केंद्र सुरू करताना संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना अधिकृत माहिती न देता, तातडीने खरेदी सुरू केल्याने सुरुवातीलाच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचीच मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे हे खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे अनेक शेतकरी अजूनही नोंदणी, तारीख, ऑनलाइन टोकन याबाबत अनभिज्ञ असताना व्यापारी मात्र अगदी नियोजनबद्ध पद्धतीने कापूस विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळे हे काय गौडबंगाल आहे? अशी जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रांचा मूळ उद्देश बाजूला सारून व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रकार सुरू आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात येत आहे. आता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता, शेतकऱ्यांना पूर्वसूचना आणि व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपावर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
दत्ता फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी संघटना
ठरावीक वाहनातून कापूस विक्री...?
आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःची वाहने सुविधा उपलब्ध असतानाही तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावर ठराविक काही वाहनांतूनच मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीस येत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी योग्य केंद्र निवडताना आवश्यक माहिती मिळण्यासाठी फलक लावले जातील. या फलकांवर कापूस खरेदी केंद्रांची ठिकाणे, खरेदी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात येणार असून, त्याबाबत बाजार समितीला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
महेश बामणे, व्यवस्थापक, शेवगाव केंद्र