

गोरक्ष शेजूळ
नगर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लागू करण्यात आलेल्या 50 टक्के कर सवलत वसुली योजनेला गावोगावी ग्रामस्थांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नगर जिल्ह्यातील 1327 पैकी सर्व 1327 ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन कर सवलतीचे आवाहन केले आणि पाहता पाहता अवघ्या 60 दिवसांत तब्बल 17.04 कोटी रुपयांची विक्रमी वसुली ग्रामपंचायतीकडे जमा झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे अभियान यशस्वी होताना दिसले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाकांक्षी ग्रामीण विकास अभियान आहे. त्यातील प्रमुख उद्दिष्टे हे ग्रामपंचायतींच्या कामकाजात लोकाभिमुख, पारदर्शक व जबाबदार प्रशासन आणणे आहे. ग्रामपंचायत स्वनिधी, यात कर वसुली व इतर स्त्रोतांमधून गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, याशिवाय पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संरक्षणावरही लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे. मनरेगा, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत आणि इतर सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही यात मार्गदर्शन आहे. महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती व सर्वसमावेशक विकास यासह ग्रामपंचायतींमध्ये डिजिटायझेशन, ऑनलाइन करभरणा, ई-सेवा यासह कर वसुलीबाबतही आवश्यक सूचना आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात हे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या मायक्रो नियोजनामुळे अभियान काळात 50 टक्के सवलतीतून 17 कोटींची वसूली शक्य झाली आहे. यात आणखी वाढ होणार आहे. सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी गावोगावी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांना विश्वासात घेतल्याने ही वसूली शक्य झाली असल्याचेही सांगितले जाते.
जिल्ह्यात 50 टक्के सवलतीचा थेट फायदा दिला जात आहे. यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे. या योजनेमुळे कर भरण्याचा भार हलका झाला. गावकऱ्यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य देत उत्साहाने कर भरल्याचे दिसले. यातून,ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती मजबूत झाली रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांसाठी तात्काळ निधी उपलब्ध झाला असून, गावांच्या स्वावलंबनाला गती प्राप्त होणार आहे.
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’मध्ये नगरची घोडदौड सुरूच सीईओंच्या मार्गदर्शनात अभियान गतीमान आहे. या अभियानामुळे 50 टक्के कर सवलतीचा ग्रामस्थ लाभ घेत आहेत. यातून, गावागावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रशासन या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल होणार आहेत. गावांचा आर्थिक पाया मजबूत झाल्यानंतर पुढील टप्प्यात अधिक विकासकामे राबवणे शक्य होणार आहे. प्रशासनाव्दारे योजनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहेच, त्याला ग्रामस्थांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दादासाहेब गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत