

राहुरी : राहुरी तालुक्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. राहुरी शहरातील एका विवाहितेला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत मानोरीमध्ये गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची फिर्याद पुढे आली. या दोन्ही घटनांप्रकरणी राहुरी पोलिसांनी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत.
राहुरी शहर हद्दीतील एक विवाहिता ही जुना कनगर रोड परिसरात शेतात काम करत होती. त्यावेळी अजय सुरेश वराळे याने तिची छेड काढली. यानंतर शिवीगाळ करत ‘आमच्या शेतात येऊ नको’ अशी धमकी दिली. या घटनेनंतर इतर काहींनी ‘त्या’ विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. प्रकृती बिघडल्याने पीडित तरुणीला तत्काळ जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती दि. 22 डिसेंबर 2025 रोजी पोलिस ठाण्यात देण्यात आली. पीडितेच्या जबाबावरून आरोपी अजय सुरेश वराळे, सुरेश सयाजी वराळे, अलका सुरेश वराळे व दिपा अजय वराळे या चौघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, मानोरी गावाच्या हद्दीत दि. 21 डिसेंबर 2025 रोजी जमिनीच्या वादातून एका 42 वर्षीय महिलेशी शिवीगाळ, दमदाटी व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले. पीडित महिला आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत लोखंडी पोल लावत असताना आरोपींनी तेथे येऊन काम थांबवण्याचा अडथळा निर्माण केला. ‘ही जमीन आमची आहे, येथे पोल लावायचे नाहीत,’ असे म्हणत शिवीगाळ करण्यात आली. पीडितेने जमीन स्वतःची असल्याचे सांगितल्यावर आरोपीने परवाना धारक पिस्तूल असल्याची धमकी देत ठार मारण्याची भीती घातली. यानंतर आरोपीने महिलेच्या अंगावर धावून जाऊन तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी रुपेश रमेश तनपुरे, लहानबाई सिताराम पोटे व प्रविण सिताराम पोटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संभाजी बडे करीत आहेत.