

पाथर्डी/खरवंडी कासार: तालुक्यातील मालेवाडी येथे मध्यरात्री सहा दरोडेखोरांनी घरात घुसून शेतकरी कुटुंबातील महिलांसह तिघांना बेदम मारहाण केली आणि सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मालेवाडी येथील संदीप रेवणनाथ खेडकर (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 21 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता ते आणि त्यांची पत्नी सुरेखा जनावरांच्या शेडमध्ये झोपले होते. घरात आई द्वारकाबाई, वडील रेवन्नाथ खेडकर, तसेच मुले व पुतणे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाज्याजवळ आवाज आल्यानंतर पत्नी सुरेखा यांनी घरासमोर जाऊन पाहिले असता ओट्यावर दोन व घराबाहेर चार असे सहा संशयित दिसून आले. काही क्षणातच दरोडेखोरांनी सुरेखा यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले.
संदीप खेडकर यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. नंतर घरात प्रवेश करून दरोडेखोरांनी आई द्वारकाबाई यांना लोखंडी गजाने मारहाण करून लोखंडी कपाट फोडले. कपाटातील सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले. एका खोलीत झोपलेल्या मुलांना व पुतण्यांना दमदाटी करून बाहेरून कडी लावून कोंडले होते.
घटनेनंतर आरडाओरड केल्याने शेजारी गोळा होताच दरोडेखोर दगडफेक करत पसार झाले. तपासणीअंती घरातून सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. जखमी तिघांवर खरवंडी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव तपास करीत आहेत.