

कैलास शिंदे
नेवासा नगर पंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मतदारांनी बदल घडवून आणला. गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या उमेदवारांना धक्का देत क्रांतिकारी निर्णय नेवासकरांनी बदलला आणि महायुतीच्या शिवसेनेच्या (शिंदे) डॉ. करणसिंह घुले यांना नगराध्यक्ष केले. गेल्या निवडणुकीचीच या वेळी पुनरावृत्ती झाली आहे. आठ वर्षांपासून नेवासा नगरपंचायत निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत पुढे ढकलली जात होती. अनेक वेळा निवडणुकीची चर्चा होत असल्याने गडाख गट व महायुतीकडून मोर्चेबांधणी होत राहिलेली आहे. परंतु इच्छुकांचा नेहमी हिरमोड झाला.
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत गडाख गटाने उबाठा सेनेला बाजूला सारून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून पूर्वी उपनगराध्यक्ष असलेले व सध्या बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांना त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. महायुतीकडून अखेरपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर काथ्याकूट झाला. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपला की शिंदे सेनेला हे निश्चित होत नव्हते. भाजपकडून शंकरराव लोखंडे आणि शिंदे गटाकडून डॉ करणसिंह घुले या दोघांमध्ये रस्सीखेच होऊन ज्या पक्षाचा आमदार त्यांचा नगराध्यक्ष, असे धोरण राबविल्याने नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा म्हणून डॉ करणसिंह घुले यांना उमेदवारी मिळाली. नेवासकरांनी त्यांना पसंती दिली. डॉ. घुलेंना नगराध्यक्ष पदावर विराजमान केले.
या निवडणुकीत महायुतीत एकमत झाले नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व युवा नेते अब्दुल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र उमेदवार उभे केले गेले. सचिन कडू यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली गेली. तसेच काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने केवळ नगराध्यक्ष पदाचे अल्ताफ पठाण यांना उभे करून महाआघाडी मधून स्वतःचे अस्तित्व दाखवले. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात 6 उमेदवार असले तरी शिंदे गटाचे डॉ. करणसिंह घुले, क्रांतिकारीकडून नंदकुमार पाटील, राष्ट्रवादीचे सचिन कडू व काँग्रेसचे अल्ताफ पठाण यांच्यात लढत झाली असली, तरी खरी लढत डॉ. करणसिंह घुले व नंदकुमार पाटील यांच्यातच अटीतटीची झाली. त्यात डॉ. घुले विजयी झाले.
नेवाशात सेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सांगता सभा पावली. प्रचारात माजी खासदार सुजय विखे यांची पहिल्या टप्प्यात झालेली सभा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अखेरच्या टप्प्यात धुमधडाक्यात प्रचारफेरी, उमेदवारांना निवडणूक काही दिवस पुढे ढकलल्यामुळे प्रचारास वेळ मिळाला. मतदारांच्या गाठीभेटीवर जादा भर दिला. समर्पण फाउंडेशनच्या कार्याचे श्रेय तसेच नवीन चेहरा व नेवाशात बदल यावरच महायुतीने मोठ्या प्रमाणावर भर दिल्याने डॉ. करणसिंह घुले यांच्या विजयाला हातभार लागला. गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून मतदारांच्या गाठीभेटी, प्रचारफेरी यावरच अधिक भर देण्यात आला. क्रांतिकारीकडून मोठ्या प्रचारसभा झाल्या नाहीत. अशा कारणांमुळे पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अजितदादांच्या राष्ट्रवादी पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या अल्ताफ पठाणला 1431 पर्यंत थांबावे लागले. नेवाशात प्रथमच शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आहे. आमदार विठ्ठलराव लंघे व पंचगंगाचे सर्वेसर्वा प्रभाकर शिंदे यांच्या नियोजनामुळे सेनेचा नगराध्यक्ष होण्यास बरीच मदत झाली.
गेल्या वेळेसारखीच राजकीय स्थिती!
नेवासा नगरपंचायतीच्या गेल्या व पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे तत्कालिक आमदार बाळासाहेब मुरकुटे असताना भाजपाच्या संगीता बर्डे नगराध्यक्ष झाल्या होत्या, तर गडाख गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊन बहूमत त्यांना मिळाले होते. आता त्याप्रमाणे शिवसेनेचे शिंदे गटाचे आ. विठ्ठलराव लंघे असताना शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉ करणसिंह घुले झाले, तर गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला बहुमत मिळाले आहे.