

बाळासाहेब खेडकर
शेवगाव नगर परिषदेच्या अत्यंत अटीतटीच्या व चौरंगी झालेल्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या माया अरुण मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या विद्या अरुण लांडे यांचा अवघ्या 86 मतांनी धुव्वा उडवत पराभव केला आहे. या लढतीत सत्ताधारी भाजपचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने शेवगावच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा निकाल म्हणजे साखर सम्राट व सत्ताधाऱ्यांना जनतेचा थेट इशाराच मानला जात आहे.
शिवसेनेचे ऐतिहासिक खाते
24 जागांच्या नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 10, भाजप - 7, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 4, शिवसेना (शिंदे गट) - 3 असा निकाल लागला असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शेवगाव नगर परिषदेत प्रथमच शिवसेनेने खाते उघडत इतिहास घडवला आहे.
भाजपची गटबाजी, सत्तेची माती
भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे यांनी पत्नी माया मुंडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न केले. मात्र आमदार मोनिका राजळे यांनी डावलत नातेवाईकांना उमेदवारी बहाल केल्याचा आरोप झाल्याने भाजपातील अंतर्गत गटबाजी उघडी पडली. परिणामी मुंडे यांनी बंड पुकारून शिवसेना शिंदे गटाकडून अचानक रणांगणात उडी घेतली आणि भाजपच्या सत्तेवर थेट घाव घातला.
दिग्गजांची पडझड
या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले गटाचे सर्वेसर्वा अरुण पाटील लांडे, यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा विद्या लांडे व चिरंजीव अजिंक्य लांडे यांना दुसऱ्यांदा जनतेने नाकारले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे यांना भाजपचे विद्यमान नगरसेवक सागर फडके यांनी मोठ्या फरकाने धूळ चारली. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाधक्ष्य अविनाश मगरे यांच्या पत्नीचा राष्ट्रवादीच्या सुवर्णा राहुल मगरे यांनी पराभव केला आहे.
अटीतटीचे प्रभाग - दोन मतांनी सत्ता!
प्रभाग 5 : कुरेशी सलमाबी अन्वर (631) विजयी, जयश्री राहुल मालुसरे (629) पराभूत - फक्त 2 मतांनी! प्रभाग 9 ब : संतोष शरद जाधव (500) विजयी, अमोल सागडे (498) पराभूत - 2 मतांची लढत! प्रभाग 11 : भाजपचे गणेश कोरडे यांचा राष्ट्रवादीचे सुनील काकडे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला.
शिवसेना ‘किंगमेकर’; डहाळेंची निर्णायक भूमिका
शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी स्वतः विजय मिळवत शिवसेनेचे खाते उघडले आणि सध्याच्या सत्तासमीकरणात किंगमेकर ठरले आहेत.
सभा नाही, आत्मविश्वास नाही
माया मुंडे यांनी शेवटच्या दिवशी बंड पुकारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकमेव सभा घेत वातावरण बदलले. जनशक्तीचे शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बळ मिळाले. उलटपक्षी राष्ट्रवादी घुले गट व भाजपाने राज्य पातळीवरील एकही मोठी सभा न घेतल्याचा फटका बसला गेला आहे
भावी निवडणुकांसाठी धोक्याची घंटा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल शिवसेनेला बळ देणारा, तर भाजपच्या आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रतापराव ढाकणे यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची जोरदार चपराक ठरला आहे.
हा सर्वसामान्यांचा विजय: माया मुंडे
विजयानंतर माया मुंडे म्हणाल्या, की मी भाजपची निष्ठावंत कार्यकर्ती होते. उमेदवारी नाकारली गेली. तीन बलाढ्य साखर सम्राटांच्या विरोधात सामान्य मतदारांनी अन्यायाविरुद्ध उभे राहत हा विजय मिळवून दिला. ही सत्ता नाही, सर्वसामान्यांचा उठाव आहे! शेवगावचा हा निकाल म्हणजे सत्ताधाऱ्यांना दिलेला थेट इशारा जनतेला गृहीत धराल, तर सत्ता हातातून निसटेल!