

नगर: अल्पवयीन मुलीला विवाहाची जबरदस्ती करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना मारहाण केली आणि तिला मुख्य आरोपीसोबत लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर मुख्य आरोपीने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यातून ती गर्भवती राहिली.
पीडितेने गर्भधारणेची माहिती दिल्यानंतर, आरोपींनी हे मूल नको असल्याचे सांगून तिला मारहाण केली. तसेच तिला गर्भपात करण्यासाठी धमकावून शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.