Parner Panchayat Election: पारनेर पंचायत समितीवर महिलाराज!
शशिकांत भालेकर
पारनेर : पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने पारनेर पंचायत समितीवर महिलाराज येणार आहे..(Latest Ahilyanagar News)
पंचायत समिती निवडणुकीसाठी सभापतिपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वीच पारनेर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप गट गण आराखडा प्रसिद्ध झाला आहे. आराखडा प्रसिद्ध होताच निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग आला होता.
मागील निवडणुकीमध्ये शिवसेना चार, राष्ट्रवादी चार, काँग्रेस दोन असे पक्षीय बलाबल राहिले होते. यापूर्वी गेल्या दहा वर्षांपासून पंचायत समितीवर ओबीसी व सर्वसाधारण असे आरक्षण असल्याने दोन्ही वेळेस पुरुष सभापती राहिले.
यावेळेस खुल्या गटातील महिला राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. मात्र, आपल्या सौभाग्यवतींना ते या निवडणुकीत पुढे करतील अशी शक्यता आहे.
गेल्या दहा वर्षांत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. दहा वर्षांपूर्वी माजी आ. विजय औटी यांचे पंचायत समितीवर वर्चस्व होते. त्यासोबतच माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांची भूमिका त्या दरम्यान निर्णायक ठरली. मात्र, त्यानंतर तत्कालीन आ. नीलेश लंके यांच्या कार्यकाळात निवडणुका झाल्या नाहीत. ते खासदार झाले.
अद्याप निवडणुका झाल्या नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना पंचायत समितीत संधी मिळाली नाही. मात्र, आता महाविकास आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे असल्याने खा. लंके यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे असे बोलले जाते.
विधानसभेला तालुक्यात झालेल्या उलथापालथेत काशिनाथ दाते यांना विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. जवळपास वर्षभराचा कालावधीमध्ये पंचायत समिती निवडणुका होत असल्याने महाविकास आघाडीच्या भाजपसह सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी आशा असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे तिकीटवाटपाची डोकेदुखी त्यांच्यासमोर असणार आहे.
गणांच्या आरक्षणानंतरच राजकीय घडामोडींना वेग
पारनेर पंचायत समिती सभापतिपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले असले, तरी तालुक्यात पंचायत समिती गणाचे आरक्षण बाकी आहे. ते आरक्षण दि. 13 रोजी पारनेर तहसील कार्यालयात आरक्षण सोडतीनंतर जाहीर होतील. आरक्षणावरच पारनेर तालुक्यातील इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे त्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
झावरे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत
पारनेर तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्या चित्र असले, तरीही महायुतीमध्ये राष्ट्रवादींतर्गत मतभेदातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे वेगळे भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याने महायुतीत असूनही सवतासुभा करतील का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

