

नगर तालुका : अहिल्यानगर-दौंड रेल्वेलाईनवरील सारोळा कासार (ता. नगर) पूर्वीचे गेट नं. 24 शेजारी तयार केलेल्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असून, त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या 3-4 गावांतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या साचणाऱ्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा मंगळवारी (दि. 14) सारोळा कासार रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सारोळा कासार व घोसपुरी गावच्या नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.(Latest Pune News)
या बाबत रेल्वेचे सीनियर सेक्शन इंजिनियर अजयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, हे रेल्वे गेट बंद करून तयार केलेला बोगदा चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. हा बोगदा तयार करताना कोणतेही तांत्रिक नियोजन न करता बोगदा तयार केलेला असल्याने दर पावसाळ्यामध्ये हा बोगदा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत असून, परिसरातील गावांचा संपर्क तुटत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. सध्या गेल्या 15 दिवसांपासून या बोगद्यामध्ये पाणी असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
रेल्वे प्रशासनाने या बोगद्यामध्ये साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा किंवा पूर्वीप्रमाणे रेल्वे फाटक पुन्हा सुरू करावे. दोन्ही पैकी एक काहीतरी काम पुढील 7 दिवसांत न झाल्यास 14 रोजी सारोळा कासार रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या वेळी नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संजय धामणे, जयप्रकाश पाटील, प्रभाकर घोडके, संजय काळे, डॉ. बाबासाहेब कडूस, बापू शेळके आदी उपस्थित होते. या वेळी चौबे यांनी बुधवारी (दि. 8) साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काम सुरू करू, तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाऊस थांबल्यावर काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.