

गणेश जेवरे
कर्जत : तालुक्यातील राजकीय समीकरणात आता ओबीसी समाजाचा दबदबा अधिक बळकट होण्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच जाहीर झालेल्या कर्जत पंचायत समितीच्या आरक्षणामध्ये सभापतिपद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. याआधी कालच कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणदेखील ओबीसी वर्गासाठी जाहीर झाले होते. परिणामी, तालुक्यातील दोन महत्त्वाच्या पदांवर ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित झाले असून, राजकीय पटलावर त्यांचा प्रभाव वाढणार आहे.(Latest Ahilyanagar News)
पंचायत समितीचे गणांचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच सर्वांच्या नजरा सभापतिपदाच्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. यंदा पुन्हा एकदा पंचायत समितीसाठी पाच गण तयार करण्यात आले असून, प्रत्येक गणात तीव्र स्पर्धेची शक्यता आहे. मागील वेळी पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते आणि त्या वेळी सत्तेचा लगाम सुरुवातीला भाजपच्या हाती होता. मात्र, नंतर राष्ट्रवादीने सत्ता ताब्यात घेतली होती.
गेल्या सहा वर्षांपासून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका या वेळी अधिकच रंगतदार होणार आहेत. पक्षीय शक्तिप्रदर्शन, जनसंपर्क मोहिमा आणि कार्यकर्त्यांची धडपड यामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण तापले आहे.
या निवडणुकीत पुन्हा एकदा आ. रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातच थेट सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांनी आपापले गट बांधले असून, वर्चस्वासाठीचा हा राजकीय संघर्ष किती तीव्र होईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.