

नेवासा: सकाळी थंडीमुळे नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी 9 वाजेनंतर काहीसी गती आली. नगरपंचायत निवडणुकीसाठी 18 हजार 712 मतदारांपैंकी 14 हजार 608 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 78 वर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षासह 17 नगरसेवकांसाठी शनिवारी (दि.20) मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संजय बिरादार व मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.
सकाळी 11.30 वाजत़ा केवळ 15 टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदानाचा वेग मंद होता. दुपारी 1.30वाजेपर्यंत 28 टक्के मतदान झाले. 3.30 वाजता मतदानाची टक्केवारी 45.91 वर पोहचली. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. रब्बीची पेरणी, ऊस, कांदा लागवडीमुळे दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. मोबाईल आतमध्ये घेवून जाण्यास बंदी असल्या कारणांनी काही ठिकाणी शाब्दिक चकमकी झाल्या. काही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.
तहसीलच्या नव्या इमारतीत मतमोजणी
नगराध्यक्ष पदासाठी 6 तर 17 नगरसेवकांसाठी 63 उमेदवारांचे भवितव्य मशिन मध्ये बंद झाले. रविवारी तहसील कार्यालयाच्या नविन इमारतीत मतमोजणी होणार आहे.
नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे मतदान व मतमोजणीसाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलिस प्रशासन सज्ज आहे.
सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक.
पाथर्डीत 68 टक्के मतदान
पाथर्डी: पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. 23 हजार 242 मतदारांपैकी 15 हजार 750 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सुमारे 68 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वाधिक तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच शहरातील 27 मतदान केंद्रांवर मतदारांची ये-जा सुरू होती. काही प्रभागांमध्ये नेते व कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रियेत तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
पाथर्डी नगरपरिषदेसाठी दहा प्रभागांतून 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष निवडीसाठी द्यायचा 27 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. मात्र बाहेरगावी असलेले मतदार अपेक्षित प्रमाणात न आल्याने मतदानाची टक्केवारी काहीशी कमी राहिल्याची चर्चा शहरात होती. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याने प्रचारात मोठा उत्साह दिसून आला होता; मात्र त्या तुलनेत मतदानात अपेक्षित जोश दिसून आला नाही. दिवसभर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते एक-एक मतदार मतदानासाठी आणण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. भाजप व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांनी मतदान संपेपर्यंत मतदारांना मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी आलेल्या वाहनांमुळे शहरात काही ठिकाणी बाहेरील गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 1, 2, 5 आणि 10 मध्ये काही ठिकाणी नेते व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान आमदार मोनिका राजळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड तसेच बंडू पाटील बोरुडे यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत कार्यकर्त्यांकडून मतदानाची माहिती घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी स्वतः सर्व मतदान केंद्रांवर भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारच्या सुमारास प्रभाग 5 व 9 मधील मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी दिसताच त्यांनी तात्काळ 100 मीटरच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली.