

नेवासा: गेल्या वर्षभरात कांद्याला भाव मिळाला नाही. भाववाढीच्या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेरपर्यंत उन्हाळी कांदा साठवणूक ठेवला होता. परंतु कांदा संपत आला, तरी भाववाढ झालीच नाही. तालुक्यातील अनेक ठिकाणी लागवड केलेला कांदा व कांदा रोपे रोगट हवामानाने औषधांच्या फवारणीमुळे शेतकरी वर्ग वैतागला आहे.
तालुक्यातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा रोपे टाकली होती. परंतु सततच्या पावसाने अनेकांची कांदा रोपे दबली गेली. पुन्हा कांदा रोपे टाकली गेली. त्यामध्येही शेतकऱ्यांना यश आले नाही. मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्यांवर शेतकऱ्यांचा खर्च झाला. त्यामुळे काहींनी कांदा लागवडीचे प्रमाण कमी केले आहे, तर काहींना रोप विकत घेण्याची वेळ आली. एकरी कांदा लागवडीसाठी 25 ते 30 हजारांची रक्कम सांगितली जात असल्याने काहींनी कांदा लागवडीचा नादच सोडला. ज्याच्याकडे कांदा रोप आहे त्यांच्याकडून स्वतःची लागवड झाल्याशिवाय काहीच सांगितले जात नाही. आता हे प्रमाण कमी झाले आहे. सोशल मीडियावर कांदा रोपे विकणे असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सध्या कांदा लागवडीचा कालावधी नाहीसा होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी गहू पेरणी केली आहे.
सध्या लागवडी केलेल्या कांद्यावर व रोपांवर रोगट हवामानाने औषधांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. परिसरात पावसाळी व रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टी व सततच्या वातावरणातील बदलामुळे करपा व मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे महागड्या औषधांची फवारणी करून वाचवलेल्या पावसाळी लाल कांदा पिकावर परोपजीवी अमरवेलींचा प्रादुर्भाव झाला आहे.
कांदा उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे व कांटा रोपे वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या उंच व मुरमाड जमिनीत लागवड केलेला पावसाळी लाल कांदा वाचला; परंतु मागील काही दिवस रात्री धुके, पहाटे दव बिंदू, दिवसा कडाक्याचे ऊन, तर रात्री थंडी, कधी ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यामाठी महागडे कीटकनाशके औषधांची फवारणी करावी लागते. पीकवाढीच्या व कांदा गळतीच्या अवस्थेत असताना अमरवेल या परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव वाढला असून, विविध औषधांची फवारणी करूनही वेलीच्या वाढीवर नियंत्रण होत नसून कांदा पातीवर गुंडाळी करून भरममाट वाढ होत असलेल्या वेलीमुळे कांदा पिकाची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मजुरांअभावी घरीच कांदा, उसाची लागवड!
कांदा लागवडीबरोबरच ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. ऊस बेणे आणण्यापासून वीज, मजूर अशा विविध प्रश्नांचा पल्ला गाठावा लागतो. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु मजुरांअभावी ऊस लागवडीचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कोली व पाण्यात ऊस दाबण्याची मजुरी मनमानी पद्धतीने आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी घरच्या घरी लहान मुले, नातेवाईकांना सोबत घेत कांदा, ऊस लागवड करत आहेत.