

संगमनेर: शहरातील गणेशनगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे गंठण भरदिवसा ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली.
राजापूर (संगमनेर) येथील रहिवासी नंदा हासे या गणेशनगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात हेल्मेटधारी चोरटे आले. नंदा हासे यांच्या गळ्यातील 3 लाख 67 हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून धूम ठोकली. भरवस्तीत आणि भरदिवसा घडलेल्या या ‘धूम स्टाईल’ चोरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने शहर पोलिस स्टेशन गाठले. अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, चोरट्यांनी सातत्याने कारवाया करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहे.