

राहुरी: ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस पथकाने गेल्या दोन वर्षांत तब्बल 100 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आहे. यामध्ये मागील 9 वर्षांत अपहरण झालेल्या मुलींचा समावेश असून ही कामगिरी पोलिसांच्या संवेदनशीलतेचे व तत्परतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित मुलगी 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. तब्बल चार महिन्यांच्या शोधानंतर दि. 5 जानेवारी 2026 रोजी राहुरी पोलिस तपास पथकाने सदर मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले व तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. चौकशीत मुलीने सांगितले की, घरगुती कारणावरून आईशी वाद झाल्याने रागाच्या भरात ती आईच्या मामाकडे निघून गेली होती.
तेथे गेल्यानंतर तिने, घरी सांगितले तर मी इथूनही निघून जाईन अशी धमकी दिल्याने मामाने मुलीबाबत कोणालाही माहिती दिली नाही. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, गणेश लिपने, सचिन ताजने, महिला पोलीस हवालदार स्वाती कोळेकर, वंदना पवार यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव व हवालदार गणेश लिपने करत आहेत.
दरम्यान, दि. 5 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथे झालेल्या विभागीय इन्स्पेक्शनदरम्यान नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी राहुरी पोलिस ठाण्याच्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
बेलवंडीच्या कामगिरीचे कौतुक
यासोबतच, बेलवंडी परिसरात विविध राज्यांतील रेल्वे स्थानकांवरून अपहरण करून आणण्यात आलेल्या व वेठबिगारीत अडकलेल्या 23 वेठबिगारांची मुक्तता केल्याबद्दलही पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व बेलवंडी पोलिस स्टेशनच्या तत्कालीन पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.