

पोहेगाव: कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री मयुरेश्वर गणपतीची ओळख आहे. काल मंगळवारी 6 जानेवारी रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने हजारो भाविकांनी मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.
श्री गणेश ट्रस्टच्या विश्वस्तांनी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये,ो म्हणून व्यवस्थित नियोजन केले होते. श्री गणेश ट्रस्ट व मयुरेश्वर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणपती मंदिर परिसरात आलेल्या व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. भाविकांच्या वाहतुक व्यवस्थेवर हे मंडळ लक्ष ठेवून होते.
दोन दिवसापासूनच ट्रस्टच्या वतीने या चतुर्थीचे नियोजन करण्यात आले होते. मंदिरावर विद्युत रोषणाई, भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती.ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना मोफत फराळ खिचडीचे वाटप तसेच चहाची व्यवस्थाही करण्यात आली होती. यावेळी सात क्विंटल खिचडीचे वाटप करण्यात आले. कोपरगाव, येवला, शिर्डी, लासलगाव, सिन्नर, नाशिक, तसेच पोहेगाव पंचक्रोशीतील हजारो महिला व पुरुष भाविकांनी मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.
मंगळवारी पहाटे चार वाजेपासूनच भाविक दर्शनासाठी दाखल झाले. पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. झगडे फाटा ते रांजणगाव देशमुखच्या खराब रस्त्यामुळे मात्र भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भाविकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे तातडीने काम करून प्रशासनाने होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी दीपक रोहमारे यांनी केली.
देवस्थानलक ‘क’ वर्ग दर्जा
श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिराला आ.आशुतोष काळे यांनी ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून 70 लाख रुपये निधी दिला आहे. त्या निधीतून मंदिर परिसर सुशोभिकरण तसेच मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहे. भक्त निवासचे काम अंतिम टप्यात असून अनेक विकास कामे सुरु आहेत त्यामुळे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. मनातील इच्छा पूर्ण करणारे देवस्थान असा श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिराचा महिमा अहिल्यानगर जिल्ह्याबरोबरच नासिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पोहोचला असल्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी असते मात्र अंगारकी चतुर्थीला हि गर्दी अधिकच असते.