

संगमनेरः अकोले व संगमनेर तालुका कायम एक आहे. बंधू भावासह जिव्हाळ्याचे नाते त्यांच्यात आहे, परंतू काही मंडळींनी विनाकारण यामध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी पाचर ठोकण्याचे काम केले, मात्र कोणी कितीही पाचरी ठोकल्या तरी, संगमनेर- अकोले एकत्रचं राहणार आहे, असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख न करता लगवला.
शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, प्रदर्शन प्रकल्प प्रमुख सागर वाक्चौरे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग घुले, शरयू देशमुख, लक्ष्मण कुटे, कैलास वाक्चौरे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, डॉ. जयश्री थोरात, ॲड. के. डी. धुमाळ, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे,आर.बी.राहणे, संदीप वाकचौरे, नामदेव मिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ, डॉ.एम.ए. व्यंकटेश, प्रा. जी. बी.बाचकर, हिंदुस्तान फीड लिमिटेडचे एमडी मुरलीधर जगताप, थर्मोफिसर कंपनीचे जगजीतसिंग आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, कळस येथील युवकांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत जनजागृती व्हावी,यासाठी नऊ वर्षांपूर्वी प्रयोग केला. तो मोठा यशस्वी झाला आहे. आज कळस कृषी प्रदर्शन हे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ठरले आहे. यामागे मोठे कष्ट दडले आहेत. अमृतवाहिनी हे गुणवत्तेचे भाग्यवान नाव आहे. देशातील उच्च दर्जाचे महाविद्यालय येथे सुरू होऊन येथील विद्यार्थी देश- विदेशात कार्यरत व्हावेत, हा यामागचा उद्देश आहे. हॉलंड येथून आणलेले ट्युलिप गार्डन मोठे आकर्षण केंद्र ठरणार आहे, असे ते म्हणाले.
डॉ. तांबे म्हणाले की, कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी, कृषी क्षेत्रात मोठी क्रांती केली. यामुळे आज भारत अन्नधान्य क्षेत्रामध्ये सामर्थ्यवान देश झाला आहे. यावेळी रणजीतसिंह देशमुख यांचे भाषण झाले. प्रास्ताविक डॉ.जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर, सागर वाक्चौरे यांनी आभार मानले.
पिकांच्या 350 जाती
थोरात कृषी महाविद्यालयाच्या 40 एकरच्या परिसरामध्ये शैक्षणिक प्रदर्शन, कृषी, औद्योगिक प्रदर्शन, फूड स्टॉल्ससह तब्बल 69 पिकांच्या 350 जातींचा समावेश आहे. पाच एकर परिसरामध्ये झेंडू, गहू, हरभरा, मका, सोयाबीन, गुलाब, कारल्यासह विविध पिकांचे उभारलेले प्लॉट लक्षवेधी ठरत आहेत.