

कोपरगाव: कोपरगाव परिसरात धुमाकूळ घालून तीन वर्षीय बालिकेसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर वध करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री सुमारे १ वाजता टाकळी शिवारात पुणे येथून बोलावण्यात आलेल्या दोन शूटरांनी गोळ्या झाडून या बिबट्याला ठार केले.
मात्र वनविभागाने ज्याला ठार केल्याचा दावा केला आहे, तोच नरभक्षक बिबट्या आहे का, याबाबत स्थानिकांमध्ये तसेच काही अधिकाऱ्यांमध्येही साशंकता आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात विविध ठिकाणी अनेक बिबट्यांचा वावर सुरू आहे. नरभक्षक बिबट्याला त्वरित ठार मारावी म्हणून माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी मागणी केली होती.
दोन दिवसांत दोन बळी
बुधवार (दि. ५) रोजी नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा बळी घेतला होता. या घटनेला आठवडाही उलटत नाही, तोच सोमवारी (दि. १०) शांताबाई अहिलू निकोले (६०, येसगाव) यांच्यावर पुन्हा हल्ला झाला होता त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास शांताबाई आपल्या घरासमोरील शेतात जनावरांसाठी गवत कापत असताना कापसाच्या पिकात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत त्यांना ओढत नेले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून वस्तीवरील नागरिक धावत आले. लोकांचा आढोळा पाहताच बिबट्या पळून गेला; पण तोपर्यंत शांताबाईंचा जागेवरच मृत्यू झाला होता.
४० जणांची टीम, रात्रीचा सर्च ऑपरेशन
नंदिनीच्या मृत्यूनंतर वनविभागाने विशेष मोहीम सुरू केली होती. कोपरगाव, राहुरी आणि संगमनेर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून तब्बल ४० जणांचे पथक सलग आठवडाभर कार्यरत होते. ड्रोन, पिंजरे, सापळे, रात्रीचे गस्त पथक असे विविध उपाय वापरले जात होते. अखेर शनिवारी रात्री टाकळी शिवारात दिसलेल्या बिबट्यावर शूटरांनी गोळीबार केला.
तरीही दहशत कायम
तालुक्यात उक्कडगाव, चांदे कासारे, मुर्शदपूर, देरडे चांदवड, खेरडी गणेश दुल्हन बाई वस्ती परिसर, शहरानजीक असलेला चांदगव्हाण, अंबिका नगर परिसर, संवत्सर, शिंगणापूर रेल्वे स्टेशन परिसर, रामवाडी, तसेच गंगा–गोदावरी नदीकाठ या भागांत अजूनही बिबट्यांचे दर्शन होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत.
यामुळे शेतकरी आणि कामगार शेतात जाण्यास टाळाटाळ, पेरू, मोसंबी, केळी, पपई बागांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे, विद्यार्थी एकटे शाळेत जाण्यास घाबरत आहेत, वस्ती व गाव यातील रात्रीची ये-जा बंद, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अद्यापही कायम आहे.