

कोपरगाव: येणारे नवे वर्षे नवा महिना आपल्याला किती सुट्या देणार याकडे नोकरदारांचे नेहमीच लक्ष असते. त्यामुळे नव्या वर्षातल्या सुट्यांच्या यादीने नोकरदारांना नेहमीप्रमाणे दिलासा दिला आहे. 2026 च्या सुटीच्या यादीत 25 सार्वजनिक सुट्या मिळणार असून चार सुट्या शनिवारी व रविवारी येत आहेत. शनिवार- रविवार आणि प्रासंगिक मिळून तब्बल 125 सुट्यांचा लाभ नोकरदारांना या वर्षी मिळणार आहे.
नव्या वर्षात सार्वजनिक व रविवारच्या मिळून 79 सुट्या मिळणार आहेत. शनिवार मिळून सुट्याचे दिवस 104 होणार आहेत. मात्र पाच वेळा रविवारी शासकीय सुट्या येत आहेत, परिणामी या सुट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे सुट्यांच्या यादीत नसलेल्या गोपाळकाला व अनंत चतुर्दशीच्या अतिरिक्त सुट्यांची वाढ होणार आहे. यादीत नसल्या तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील या सुट्या दिल्या जातातच.
अनेक जण सुट्या पाहून फिरण्याचे किंवा इतर कार्यक्रमांचे नियोजन आखतात. त्यामुळे पुढील वर्षातील सुटीचे कॅलेंडर पाहूनच नियोजन करणे शक्य होणार आहे. नव्या वर्षात 25 गॅझेटेड सुट्या राहणार आहेत. स्थानिक पातळीवर घेण्यात येणाऱ्या आणखी सुट्या वेगळ्या असतील, त्यांचा उल्लेख शासकीय यादीत नसतो.
रविवारच्या सुट्या
महाशिवरात्री (15 फेब्रुवारी), रमजान ईद (21 मार्च), स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट), लक्ष्मीपूजन (8 नोव्हेंबर) या चार सुट्या यंदा शनिवारी-रविवारी येत आहेत. दर वर्षी अशा सुट्यांची संख्या सात ते आठ असते. यंदा त्या अल्प आहेत.