

दीपक ओहोळ
नगर: जानेवारी आला तरीही रब्बी हंगामी पिकांची पेरणी सुरुच आहे. आतापर्यंत 73.68 टक्के म्हणजे 4 लाख 1 हजार 61 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक गव्हाचा पेरा 1 लाख 14 हजार 420 हेक्टर झाली आहे. ज्वारीची पेरणी देखील 1 लाख 12 हजार 301 हेक्टरवर पोहोचली आहे. अद्याप गव्हाची पेरणी सुरु आहे.
दरम्यान, सध्या गव्हाची रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. 20 ते 30 टक्के क्षेत्रावरील गहू मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. या पिकांवर कोणतीही कीड अथवा रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही. ज्वारी वाढीच्या व पोटरी अवस्थेत आहे. पारनेर तालुक्यात ज्वारी फुलोरा अवस्थेत आहे. श्रीरामपूर व श्रीगोंदा तालुक्यांत मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत जोरदार पाऊस झाल्यामुळे यंदा रब्बी हंगाम उशीरा सुरु झाला आहे. ज्वारीची पेरणी अद्याप सुरु आहे. यंदा रब्बी हंगामासाठी उसासह 5 लाख 44 हजार 360 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निश्चित केले. त्यापैकी आतापर्यंत उसासह 4 लाख 1 हजार 61 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अन्नधान्यासाठी 4 लाख 48 हजार 967 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 3 लाख 46 हजार 312 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरबरा, मका आदींची पेरणी सुरु आहे. आतापर्यंत ज्वारीची पेरणी 69 टक्के झाली आहे. गव्हाची पेरणी 89 टक्के म्हणचे 1 लाख 14 हजार 420 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. हरबरा पिकासाठी 1 लाख 8 हजार 345 हेक्टर निश्चित असूत, आतापर्यंत 72 टक्के म्हणजे 78 हजार 413 हेक्टरवर झाली आहे. मका पेरणीला देखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मकाचा पेरा 40 हजार 446 हेक्टरवर गेला आहे. करडई, जवस, तीळ व सूर्यफूल या गळीत पिकांसाठी 57 हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत सरासरी 10 टक्के पेरणी झाली आहे.
आणखी महिनाभर पेरणी सुरु राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक 93 .3 टक्के तर सर्वात कमी पेरा राहाता तालुक्यात 70.89 टक्के इतका झाला आहे. सध्या थंडी जोरात आहे. त्यामुळे गव्हासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हितकारक ठरत आहे.94 हजार 693 हेक्टर क्षेत्रांपैकी 54 हजार 619 हेक्टर क्षेत्रावर उसाची पेरणी झाली आहे.
ऊस वगळून रब्बीची टक्केवारी
नगर 73.47, पारनेर 73.19, श्रीगोंदा 72.17, कर्जत 69.82, जामखेड 71.57, शेवगाव 81.95, पाथर्डी 73.48, नेवासा 90.51, राहुरी 81.74, संगमनेर 83, अकोले 82.3, कोपरगाव 93.3, श्रीरामपूर 77.6, राहाता 71.