

नगर: वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे व त्यांच्या सहकार्याने इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभे केले आहे. या हॉस्पिटलमधून रुग्णांना सर्व प्रकारची रुग्णसेवा मिळणार आहे. सुपर स्पेशालिटी इंम्पल्स हॉस्पिटल म्हणजे अहिल्यानगरची भूषणवाह वास्तू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. संदीप गाडे यांच्या सुपर स्पेशलिटी इंम्पल्स हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी महसूलमंत्री आमदार सुरेश धस, आमदार संग्राम जगताप, महंत हभप नामदेव शास्त्री महाराज, महंत हभप बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बाळासाहेब आजबे, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, आयुक्त यशवंत डांगे, माजी कृषी आयुक्त चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, इंम्पल्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप गाडे, डॉ. ज्योती गाडे, डॉ. गाडे यांचे वडील नवनाथ गाडे, आई फुलाबाई गाडे, डॉ. ज्योती गाडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, डॉ. संदीप गाडे यांनी अत्यंत साधारण परिस्थितीमधून वाटचाल करीत शिक्षण पूर्ण केले. कार्डिओलाजीचे शिक्षण घेताना देशांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉस्पिटलची उभारणी केली.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने डॉ. संदीप गाडे यांनी आरोग्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्या इतकीच दर्जेदार आरोग्य सुविधा नगरमध्ये मिळणार आहे. महंत हभप नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की, काही माणसे स्वभावाने खूप गोड असतात. हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस हा अर्धा औषधाने आणि अर्धा बोलण्याने बरा होत असतो हे सगळे गुण डॉ. संदीप गाडे यांच्यामध्ये आहेत.
प्रास्ताविक करताना डॉ. संदीप गाडे म्हणाले की, हॉस्पिटलच्या उभारणीसाठी कुटुंबीयांसह सहकारी मित्र परिवाराने मोलाचे योगदान दिले. गेल्या बारा वर्षांमध्ये 16 हजार हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या. 62 बेडचे सुरू केलेले हॉस्पिटल या नवीन वास्तूत 102 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहिले आहे. कोरोनामध्ये रुग्णांमध्ये विश्वास, सुरक्षा व विश्वासार्हता निर्माण केली. 40 हजार पेक्षा अधिक जणांवर उपचार केले. हॉस्पिटलमध्ये शासकीय योजना, कॅशलेस सुविधांसह रुग्णांच्या सेवेसाठी अद्यावत डॉक्टरांची टीम सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबा शिंदे यांनी करून दिला तर, शेवटी डॉ. महेश घुगे यांनी आभार मानले.
इंम्पल्स मुळे वैभवात भर: आ. जगताप
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत दर्जेदार वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रॅक्टिस करून नगरमध्ये रुग्ण सेवा करीत आहे. त्यापैकीच डॉ. संदीप गाडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. इंम्पल्स हॉस्पिटलने शहराच्या वैभवात भर पडली आहे.
तज्ञ डॉक्टरांची टीम देणार आरोग्य सेवा
हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप गाडे, डॉ. ज्योती गाडे, डॉ. श्रीरंग रानडे, डॉ. महेश घुगे, डॉ. बी. बी. शिंदे, डॉ. विजय गाडे, डॉ. ईश्वर कणसे, डॉ. सागर चौधरी, डॉ. ऋषीकेश पवार, डॉ. संजय वरुडे, डॉ. संदीप सायकड, डॉ. अतुल गुगळे, डॉ. सोनाली कणसे.
रुग्णसेवेची क्रांती म्हणजे इंम्पल्स: सभापती शिंदे
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, इंम्पल्स हॉस्पिटलच्या निर्मिती मागे डॉ. संदीप गाडे यांचे अपार कष्ट आणि मेहनत आहे. हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी अनेक रुग्णांची सकारात्मक आशीर्वाद त्यांना लाभले. इंम्पल्स हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊन पुन्हा घरी जाणे आणि त्याने स्वतः इतरांना हॉस्पिटलची महती सांगणे हीच खरी इंम्पल्स हॉस्पिटलची क्रांती आहे.
डॉ. गाडे भविष्यातील डॉ. नीतू मांडके: आ. धस
आमदार सुरेश धस म्हणाले की, देशांमध्ये पूर्वी सर्व राजकीय नेते परदेशात जाऊन ओपन हार्ट सर्जरी करत होते. त्यात एकमेव बाळासाहेब ठाकरे असे नेते होते की त्यांनी स्वतःची ओपन हार्ट सर्जरी महाराष्ट्रात केली. ती सर्जरी करणारे डॉ. नीतू मांडके होते. त्यामुळे माझे एक स्वप्न आहे की, डॉ. संदीप गाडे हे सुद्धा एक दिवस या राज्याचे नीतू मांडके होतील, इतकी गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे.