

ढोरजळगाव: सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतीची माती खरवडून गेली व विहिरींची पडझड झाली. त्यास तीन महिने उलटले तरी शेवगाव तालुक्यात अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
सप्टेंबरमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक नद्यांना पाणी येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. महापुरामुळे जमिनीतील माती खरडून गेली, बांध वाहून गेले. शेतामध्ये मोठे खड्डे पडले, विहिरींची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली, तर पुरामुळे मनुष्य हानी बरोबरच अनेक जनावरे वाहून गेली. कोंबड्या वाहून गेल्या, नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, घरांची पडझड झाली. अनेक व्यापारी दुकानांमध्ये पाणी शिरून त्यांचा माल वाहून गेला. तातडीने शासन निर्णयानुसार बाधितांना व अपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिरायत पिकांसाठी 8500, बागायतीसाठी 17 हजार, तसेच बहुवार्षिक पिकांसाठी 22 हजार 500 रुपये प्रतिहेक्टर मदत जाहीर केली. महापुरामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना 4 लाख, अवयव निकामी झाल्यास2.5 लाख, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपये, मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरांसाठी 37 हजार 500, ओढ काम करणारी 32 हजार, लहान जनावरे 20 हजार, कुक्कुटपालनधारकांसाठी 100 रूपये प्रति कोंबडी, शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी 18 हजार रुपये, शेतजमीन खरडून गेल्यास 47 हजार प्रतिहेक्टरी मदत, तसेच रोजगार हमी योजनेतून शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी प्रतिहेक्टरी 3 लाख रुपये, अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी 30 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.
त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. त्याची अंमलबजावणी तहसीलदार शेवगाव व कृषी विभागाने करून मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळाली, तसेच वाढीव नुकसान भरपाई मिळाली. मात्र, या मदतीपासून तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही वंचित आहेत. त्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झाली नाही. महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली यासंदर्भात अजूनही कुठला निर्णय झालेला नाही, नदीकाठच्या अनेक कुटुंबांच्या घरात महापुराचे पाणी शिरून संसारोयोगी साहित्य वाहून गेले. घरांची पडझड झाली, अनेकांची घरे पडली त्यांना अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही.
आठ दिवसांत अनुदान: दहाडदे
दरम्यान शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांच्याशी संपर्क साधला असता, येत्या आठ दिवसांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून बाधितांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.