

नगर: शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या जागांवर राष्ट्रवादी-भाजपने दावा सांगितला होता. त्यावर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये बोलणी सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात काहीच तोडगा निघाला नाही. अखेर ‘तुमचे-आमचे जमणार नाही,’ असा निरोप भाजपने धाडल्यानंतर शिवसेनेने लगोलाग पत्रकार परिषद घेऊन सवतासुभा मांडला. महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे 50 जागा लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे महायुतीचे चर्चेचे गुऱ्हाळ थांबले.
भाजपकडून तुमचे आमचे जमणार नाही असा निरोप आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 29) रात्री आठ वाजता पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, प्रवक्ते, संपर्कप्रमुख संजीव भोर, शहरप्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले, की शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे बैठक घेऊन, ‘महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळत असतील तर, महायुती करा,’ असे स्पष्ट केले होते. संपूर्ण राज्यात महायुतीसाठी शिवसेना आग्रही होती. त्यानुसार आम्ही गेल्या आठ दिवसांपासून भाजप, राष्ट्रवादीबरोबर चर्चा करीत होतो. नगरमध्ये आम्ही केवळ 24 जागांवर दावा केला होता. त्या सर्व जागा आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या आहेत. त्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात भाजप, राष्ट्रवादीने आमच्या प्रभाग 9, 11, 15 व 16 मधील जागांवर दावा सांगितला. त्या जागा विद्यमान नगरसेवक अनिल शिंदे, संतोष गेणप्पा यांच्या आहेत. तरीही आमची चर्चा सुरू होती. आम्ही महायुतीसाठी आशावादी होतो.
काल रात्री चर्चा झाल्यानंतर आम्हाला आज सकाळी पुन्हा चर्चा करू असे सांगितले. त्यानंतर दुपारी तीन वाजता चर्चा करू असे सांगितले. दुपारी तीन वाजता माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे निकटवर्तीय नितीन कुंकलोळ यांचा फोन आला. त्यांनी ‘तुमचे-आमचे जमणार नाही’ असा निरोप दिला. त्यानंतर तत्काळ राज्याच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
भाजप-राष्ट्रवादीने आम्हाला डावलले. आम्ही स्वतः युती तोडली नाही. भाजपचे नितीन कुंकलोळ यांनी फोन करून स्वतंत्र निर्णय घेण्याचा निरोप दिला. त्यांना वाटते आमच्यात कोणी नेता नाही. पण, मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे.
अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
पक्षाचे 50 एबी फॉर्म आलेही...
शिवसेनेला स्वतंत्र लढण्याची वेळ येऊ शकते याची जाणीव पदाधिकाऱ्यांना आधीच आली असावी. त्यासाठी पक्षाने 50 एबी फॉर्म आधीच पाठवून दिले आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवारांनी आज एबी फॉर्म जोडूनच अर्ज भरले. त्याच जागेवर भाजप दावा सांगत होते. कदाचित युती फिस्कटण्याला हेही कारण असू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
विक्रम राठोड शिवसेनेत
माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांचे चिरंजीव तथा शिवसेना उबाठाचे युवा सेना राज्य सचिव विक्रम राठोड आज शिवसेनेत सामील झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
अहिल्यानगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेने तीन ते चार महापौर दिले आहेत. महायुती टिकविण्याला आम्ही प्राधान्य दिले. मात्र, जेथे शिवसैनिकांना डावलले जाईल, तेथे सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी रिंगणात उतरणार आहोत.
संजीव भोर, प्रवक्ते, संपर्कप्रमुख, शिवसेना