

कोल्हार : लोणी येथील कारखानदारी, शिक्षण संस्था, महिला रोजगार, टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू बनवण्याचे उद्योग, आदीसह लोणीचा सर्वांगीण विकास पाहून मला समाधान वाटले. लोणी ग्रामपंचायतला कोणत्याही स्पर्धेत उतरायची गरज नाही. इतर गावांनीच लोणीच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे ब्रँड अँबेसेडर सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते भाऊ कदम यांनी काढले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमप्रसंगी अभिनेते भाऊ कदम हे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील होत्या. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, विकास अधिकारी विवेक गुंड, लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच कल्पना मैड, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर, उपसरपंच गणेश विखे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव विखे, अनिल विखे, ट्रक प्रवरा ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, राहुल धावणे आदीसह ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य तसेच लोणीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्यातून आज विकासाच्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. लोणी गावात एकोपा असल्याने सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन आम्ही काम करतो.
गावासाठी जे योगदान द्यावे लागते, त्यात सर्व ग्रामस्थ सहभाग देत असल्याने आम्हाला कामाची प्रेरणा मिळते. लोणी गावाने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू उद्योग सुरू केला, तसेच चाळीस हजार महिलांचे संघटन करून प्रत्येक महिला सक्षम बनवण्याचे महत्वपूर्ण काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीचे काम केले आहे, असे सांगून, लोणी ग्रामपंचायतीने केलेला अनेक नावीन्यपूर्ण व विकास कामाचा त्यांनी लेखाजोखा मांडला.
यावेळी अभिनेते भाऊ कदम यांचा लोणी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल विखे, सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले.
भाऊ कदम म्हणाले की, पूर्वी बायकांना मोबाईल रिचार्जसाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागत, परंतु लाडकी बहिण योजनेमुळे आता नवऱ्यालाच मोबाईलचा रिचार्ज संपल्यावर बायकोला थोड्यावेळ हॉटस्पॉट देते का? अशी विनवणी करावी लागते, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.