Kukadi Project: कुकडी प्रकल्पाला ५,७०४ कोटींची मंजुरी; डिंबे-माणिकडोह बोगद्याचा मार्ग मोकळा

१६ किलोमीटरच्या बोगद्यामुळे अहिल्यानगरसह पुणे, सोलापूरमधील १.४४ लाख हेक्टर सिंचनाला चालना; दक्षिण नगरच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा
Dimbhe Dam
Dimbhe DamPudhari
Published on
Updated on

श्रीगोंदा: कुकडी प्रकल्पाच्या सुधारित ५,७०४ कोटींच्या खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने अहिल्यानगरसह तीन जिल्ह्यांतील दीड लाख हेक्टर ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. या अंतर्गतच डिंभे-माणिकडोह सुमारे १६ किलोमीटर लांबीचा बोगदा होणार असल्याचे सांगण्यात येते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासूनचा हा पाणीप्रश्न आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या पाठपुराव्याने सुटला. भाजपचे उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

Dimbhe Dam
MHT CET Data Leak: MHT-CET डेटा लीकचा गंभीर आरोप; विद्यार्थ्यांचा खासगी डेटा विकल्याचा दावा, अहिल्यानगरात मोर्चा

कुकडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंबे ते माणिकडोह धरणांना जोडणाऱ्या सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कुकडी प्रकल्पातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण अहिल्यानगरचा दुष्काळी पट्टा दुष्काळमुक्त होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Dimbhe Dam
Hanmantgaon Leopard Terror: हणमंतगावात बिबट्याची दहशत कायम; चिमुकल्यावर झेप घेण्याचा प्रयत्न, बहिणीच्या प्रसंगावधानाने जीव वाचला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिंबे–माणिकडोह बोगद्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कुकडीच्या डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न अधिक भक्कम होणार आहे. याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, दक्षिण नगर भागातील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न भाजप आणि आपणच मार्गी लावू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. आज राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ते आश्वासन प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

Dimbhe Dam
Ahilyanagar Rain Deficit: नगर जिल्ह्यात पावसाची पाठ; तीन महिन्यांत ८४ टक्केच पाऊस, ९७ टँकरने पाणीपुरवठा

अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणात

डिंबे आणि माणिकडोह ही दोन्ही धरणे कुकडी धरणमालिकेतील महत्त्वाची धरणे आहेत. माणिकडोह धरणाची क्षमता सुमारे १०.५ टीएमसी आहे. मात्र, स्थानिक पावसाच्या पाण्यावर हे धरण अपेक्षित प्रमाणात भरत नाही. दुसरीकडे, डिंबे धरण आणि त्याखालील घोड धरण भरल्यानंतर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी खालच्या भागाकडे वाहून जाते.

या पार्श्वभूमीवर डिंबे धरणातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळविण्याची संकल्पना आहे. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अधिक प्रभावी वापर करता येणार असून, माणिकडोह धरणाची साठवण क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यास मदत होणार आहे. माणिकडोह धरणातील पाण्याचा मुख्य उपयोग कुकडी डावा कालवा आणि त्याखालील लाभक्षेत्रातील शेतीसाठी होणार असल्याने या प्रकल्पाचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चास ५,७०४.५० कोटी रुपयांची मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे. या माध्यमातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला नियमित पाण्याचा आधार मिळाल्यास पीक पद्धतीत बदल होण्याबरोबरच शेती उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

Dimbhe Dam
Rahuri Shani Shinganapur Railway: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला सुरुवात; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

दक्षिण नगरच्या पाणीप्रश्नाला निर्णायक दिशा

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न हा अनेक वर्षांपासूनचा विषय आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी अडविणे आणि ते दुष्काळी भागाकडे वळविणे या दृष्टीने डिंबे–माणिकडोह बोगदा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. डिंबे धरणातील अतिरिक्त पाणी माणिकडोहकडे वळविल्यानंतर त्याचा उपयोग कुकडी डावा कालवा आणि त्याखालील लाभक्षेत्रासाठी करता येणार आहे. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ होऊन दक्षिण नगरच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा मिळेल.

दक्षिण नगरला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ओव्हरब्रिज, साकळाई योजनेनंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाला आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चालाही मोठी मान्यता मिळाल्याने सिंचनाचा प्रश्न अधिक व्यापक पद्धतीने मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाठपुरावाही केला जाईल,” असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. तसेच माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते यांनी या प्रश्नासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news