Ahilyanagar Rain Deficit: नगर जिल्ह्यात पावसाची पाठ; तीन महिन्यांत ८४ टक्केच पाऊस, ९७ टँकरने पाणीपुरवठा

ऑगस्टमध्ये ७४ टक्के पावसाची तूट; ९४ गावे आणि ५०१ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा
Farmer
FarmerPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात जुलै महिन्‍यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला असला, तरी जून महिन्‍यात मात्र ३८ टक्के आणि ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाची ७४ टक्‍के तूट झाली. त्‍यामुळे गेल्‍या तीन महिन्‍यांत सरासरीच्‍या ८४ टक्‍के पावसाची नोंद झाली. ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाचा मोठा खंड पडल्‍यामुळे खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. त्‍यामुळे सप्‍टेंबर महिन्‍यात दमदार पावसाच्‍या प्रतीक्षा आहे. आभाळात रोज कोरडे ढग वाहताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी दाटत असल्याचे दिसत आहे.

Farmer
Rahuri Shani Shinganapur Railway: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला सुरुवात; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

जिल्ह्यात जुलै महिन्‍यात १६६ टक्‍के पाऊस झाला. त्‍यामुळे खरीप पेरणी शंभर टक्‍के होण्‍यास मदत झाली. यंदा भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणे ओव्‍हरफ्‍लो झाली असून, मुळा ९५ टक्‍के भरले आहे. दमदार पावसाअभावी सीना धरणे फक्‍त ३८ टक्‍के भरले आहे.

पाणीटंचाईच्‍या झळा

गेल्‍या तीन महिन्‍यांत सरासरी ३०१.१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्‍त २५४ मिलिमीटर झाला. त्‍यामुळे भूजलपातळी अद्याप खालावलेली आहे. त्‍यामुळे नगर, संगमनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव आदी तालुक्‍यांतील ९४ गावे आणि ५०१ वाड्यांत पाणीटंचाईच्‍या झळा सुरू आहेत. ऑगस्‍ट महिन्‍यात ९५.४ मिलिमीटर अपेक्षित असताना फक्‍त २७ मिलिमीटर पाऊस झाला. त्‍यामुळे खरीप हंगामी पिके जळू लागली आहेत. अकोले, कर्जत व श्रीगोंदा या तीन तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्‍यामुळे पिके समाधानकारक आहेत. मात्र, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी व नेवासा आदी तालुक्‍यांत पावसाची तूट आहे. त्‍यामुळे या तालुक्‍यांत परिस्‍थिती गंभीर आहे.

Farmer
Kukadi Sugar Factory: कुकडी कारखान्यावर ३७० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीची नोटीस; जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर खळबळ

शेवगावमध्ये १८ गावांना १४ टँकरने पाणी

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेवगाव तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. पावसाअभावी पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नसून अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचे उद्भव आटत चालल्याने टँकरची मागणीही वाढू लागली आहे. सध्या तालुक्यातील १८ गावांतील १०३ वाड्या-वस्त्यांमध्ये १४ टँकरच्या २८ खेपांद्वारे २६ हजार ६५५ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश दहिफळे यांनी दिली.

पावसाळ्याचे जून, जुलै आणि ऑगस्ट हे महत्त्वाचे महिने संपत आले असतानाही तालुक्यातील नदी, नाले व ओढे वाहतील इतका दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक गावांमध्ये विहिरींची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Farmer
Nevasa Encroachment Dispute: नेवासा शहरात तणाव; अतिक्रमणाच्या वादातून वाहनाची तोडफोड, पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली

गटविकास अधिकारी दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुर्शतपूर, थाटे, वाडगाव, आखेगाव, बेलगाव, सोनेसावंगी, बाडगव्हाण, मुरमी, लाडजळगाव, राक्षी, चेडेचांदगाव, ठाकूर निमगाव, वरखेड, दिवटे, शेकटे खुर्द, सुकळी, कोळगाव आणि हसनापूर या १८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

यामध्ये मुर्शतपूर, थाटे, वाडगाव, बाडगव्हाण, मुरमी, वरखेड, दिवटे, शेकटे खुर्द, सुकळी आणि कोळगाव येथे प्रत्येकी एक टँकर; आखेगाव, बेलगाव, सोनेसावंगी, राक्षी, चेडेचांदगाव, ठाकूर निमगाव व हसनापूर येथे प्रत्येकी दोन टँकर, तर लाडजळगाव येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Farmer
Pohegaon Rain Deficit: पोहेगाव परिसरात पावसाने ओढ दिली; खरीप पिके कोमेजली, बळीराजा चिंतेत

आणखी दोन गावांची टँकरकडे धाव

पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याने गायकवाड जळगाव आणि भातकुडगाव या दोन गावांसाठी प्रत्येकी एक टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या १८ गावांसह १०३ वाड्या-वस्त्यांतील २६ हजार ६५५ नागरिकांना प्रति व्यक्ती २० लिटर या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने पुढील काही दिवसांत दमदार हजेरी लावली नाही, तर तालुक्यातील पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पावसाकडे डोळे

पावसाळ्याचा कालावधी निम्म्याहून अधिक उलटूनही पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.

यात ९७ टँकर सुरु

जून महिन्‍यांपासूनच संगमनेर, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत व जामखेड तालुक्‍यांत टँकर सुरु आहेत. दमदार पावसाअभावी या तालुक्‍यांत ९७ टँकर धावत आहेत. पावसाळी दिवसांत जवळपास पावणेदोन लाख लोकसंख्‍येला टँकरवर अवलंबून राहण्‍याची वेळ आली आहे. पावसाने आणखी दडी मारल्‍यास टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता बळावली आहे.पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक ३१ गावे आणि १७१ वाड्यांत पाणीटंचाई आहे. या गावांना ४१ टँकरव्‍दारे पाणीपुरवठा सुरु आहे. आजमितीस संगमनेर तालुक्‍यात ५, नेवासा तालुक्‍यात १, अहिल्‍यानगर तालुक्‍यात १८, पारनेर तालुक्‍यात ४, शेवगाव तालुक्‍यात १४, कर्जत तालुक्‍यात ११ तर जामखेड तालुक्‍यात ३टँकर धावत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news