

नगर: कृषीपर्व कृषी महोत्सवाचा पाचव्या दिवशी सोमवारी (दि.9) झेडपी सीईओ आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या महोत्सवात 4 लाखांहून अधिक ग्राहकांनी व नागरीकांनी खरेदीचा आनंद लुटला. यामधून शेतकरी ते थेट ग्राहक शेतमाल विक्रीचा शेतकरी व ग्राहकांना फायदा झाला असून, पाच दिवसांत 3 कोटी 42 लाख रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, ‘कृषीपर्व’ कृषी महोत्सव वर्षातून किमान दोन वेळेस भरविण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांनी केली आहे.
अहिल्यानगर कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन जिल्हा परिषद आणि एक्सपो इंडिया ओशियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगरातील नेमाणे इस्टेट या प्रांगणात पाच दिवस कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास अनेक मान्यवरांनी भेटी देत समाधान व्यक्त केले. शेतकरी ते थेट ग्राहक शेतमाल विक्री केल्यामुळे ग्राहकांचा व शेतकऱ्यांचा फायदा झाला असून, दर्जेदार व खात्रीशीर माल ग्राहकांना उपलब्ध झाला.
शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.9) झेडपी सीईओ आनंद भंडारी यांच्या उपस्थित कृषी महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी विविध स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला. या महोत्सवाच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते स्टॉलधारकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या महोत्सवातून शेतकरी आणि ग्राहक यांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध केली याबदृल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पाच दिवसांत तीन कोटी बेचाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली. भविष्यात अशाप्रकारच्या महोत्सवातून शेतकरी व ग्राहकांच्या उन्नतीसाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी म्हटले.
या कृषीपर्व महोत्सव यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक आत्मा प्रदीप लाटे, प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, उप कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे तसेच किरण मोरे, सागर ढवळे, प्रमोद गावडे, अशोक वाळके, हर्षदा जगताप, मनिषा कवटे, क्रांती चौधरी, प्रकाश आहेर आदींसह कृषी अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.