नगर: महानगरपालिकेची निवडणूक होऊन 68 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होऊन महापौर व उपमहापौर यांची निवड झाली आहे. आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार 6 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी शासन अध्यादेशानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचीच शिफारस संबंधित पक्षांच्या गटनेत्यांना करावी लागणार आहे. मात्र, स्वीकृतसाठी पात्रता पूर्ण करण्यासाठी इच्छुकांचा कस लागणार आहे. नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) म्हणून नियुक्त होण्यासाठी शासन निर्णयानुसार पात्रता असणे आवश्यक आहे.
संबंधित राजकीय पक्षाचा गटनेता आयुक्तांकडे पात्र उमेदवारांची शिफारस करतील. आयुक्तांच्या छाननीनंतर महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाते. नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, 2010 च्या नियम 4(छ) नुसार, महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, 1950 खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असेलली असेल, या तरतूदीनुसार संबंधित व्यक्तीस धर्मादाय आयुक्तांनी अधिकृतरीत्या मान्यता दिल्यापासून समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा किमान पाच वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे. आता इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकासाठी अर्ज भरण्यासाठी पात्रता पूर्ण करताना दमछाक होणार आहे.
स्थायी समितीसाठी हालचाली वाढल्या
महापालिका महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता अनेकांना स्थायी समितीचे वेद लागले आहेत. सध्या स्थायी समिती निवडीसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. स्थायी समितीत 16 सदस्य असून त्यांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी 6 सदस्य तर, शिवसेनाचे दोन सदस्य राहणार आहेत. त्यात संख्य बळ कमी असूनही एमआयएम व काँग्रेसचीही स्थायी समितीत संधी मिळणार आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतीताई गाडे व उपमहापौरपदी भाजपचे ॲड. धनंजय जाधव यांची निवड झाली आहे. आता सर्वत्र स्वीकृत नगरसेवक पदाच्या हाचलचाली सुरू आहेत. दुसरीकडे स्थायी समितीसाठीही नगरसेवक फिल्डिंग लावताना दिसत आहेत. पहिल्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सदस्य निवडले जाण्याची शक्यता आहे. गत वेळी शिवसेना व राष्ट्रवादीचे स्थायी समितीत सर्वाधिक संख्या बळ होते. त्यात तुलनेत भाजपचे संख्या बळ कमी होते. मात्र, यंदा राष्ट्रवादी व भाजपचे संख्य बळ समसमान राहणार आहे. कारण नगरसेवकांच्या 68 जागा आणि स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 6 व भाजपला 6 जागा मिळणार आहेत. तर, शिवसेनेला स्थायी समितीत दोन जागा मिळणार आहे. संख्या बळामध्ये एमआयएम 2 व काँग्रेस 2 नगरसेवक संख्या असतानाही फॉर्म्युल्यानुसार त्यांना स्थायी समितीमध्ये इंट्री मिळणार आहेत. त्यात एमआयएम व काँग्रेसचा एका नगरसेवकाला स्थायी समितीमध्ये संधी मिळणार आहे.
पात्रता
निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक, सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील, महानगरपालिका, नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी तसेच नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी स्वीकृत सदस्य होण्यासाठी पात्र राहतील. त्यांना पाच वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
स्वीकृत सदस्य होण्यासाठी कोणालाही थेट किंवा संस्थेमार्फत स्वतःच्या नावाची शिफारस करता येणार नाही. संबंधित राजकीय पक्षाच्या गटनेत्यांनाच स्वीकृत सदस्य पदासाठी नावांची शिफारस करता येईल.
यशवंत डांगे, आयुक्त